23 February 2019

News Flash

दारुबंदीवरुन नितीशकुमारांचा ‘यू टर्न’, कायदा केला सौम्य

बिहारमध्ये सत्तेवर आल्यानंतर नितीशकुमार यांनी दारुबंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. मात्र, आता नितीशकुमार सरकारने दारुबंदी कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

संग्रहित छायाचित्र

दारुबंदीवरुन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी एक पाऊल मागे टाकले आहे. दारुबंदीसंदर्भातील कायद्यात बदल करण्यास बिहारच्या मंत्रिमंडळाने परवानगी दिली असून यामुळे दारुबंदीचा कायदा आता काहीसा सौम्य होणार आहे. आगामी अधिवेशनात हे सुधारित विधेयक विधानसभेत मांडले जाणार आहे. दारुबंदी कायद्यात बदल केल्याने नितीशकुमार यांची विरोधकांकडून कोंडी केली जाण्याची शक्यता आहे.

बिहारमध्ये सत्तेवर आल्यानंतर नितीशकुमार यांनी दारुबंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. मात्र, आता नितीशकुमार सरकारने दारुबंदी कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यमान कायद्यातील कठोर तरतुदींचा सरकारी यंत्रणांकडून गैरवापर होत असल्याची टीका होत होती. या पार्श्वभूमीवर सरकारने नियमात बदल केले आहे.

नितीशकुमार सरकारने केलेले बदल खालील प्रमाणे

> जामीनपात्र गुन्हा
दारुबंदी कायद्याअंतर्गत मद्यप्राशन करताना आढळल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल व्हायचा. या कायद्यांतर्गत पाच वर्ष शिक्षेची तरतूद होती. पण आता हा गुन्हा जामीनपात्र ठरणार असून याअंतर्गत ५० हजार रुपये दंड किंवा तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा असेल.

> मद्याची निर्मिती, तस्करी आणि विक्री करणाऱ्यांना १० वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात होती. यात आता बदल करण्यात येणार आहे. आता पहिल्यांदा पकडल्यास पाच वर्षांच्या शिक्षेची आणि दुसऱ्यांदा पकडल्यास १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

> आधी दारुच्या रिकाम्या बॉटल घरात सापडल्यास घर, वाहन किंवा जमिनीवर जप्तीची कारवाई करता यायची. तर आता घर, वाहन किंवा जमिनीवर थेट जप्तीची कारवाई करता येणार नाही. मात्र, तस्करीसाठी यापैकी कशाचाही वापर होत असेल तर जप्तीची कारवाई करता येणार आहे.

> घरात मद्य आढळल्यास घरात राहणाऱ्या १८ वर्षांवरील सर्वांवर कारवाई केली जायची. मात्र, आता फक्त ज्यांनी मद्यपान केले, त्यांच्यावर कारवाई होणार आहे.

नितीश कुमार यांनी कायद्यात बदल केल्याने विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. विद्यमान कायद्यातील तरतुदींचा सरकारी यंत्रणांनी गैरवापर केल्याचा आरोप विरोधक करत होते. अखेर विरोधकांसमोर नितीशकुमार यांना नमते घ्यावे लागले आणि कायद्यात बदल करण्यात आले आहेत.

 

First Published on July 12, 2018 4:48 pm

Web Title: bihar cm nitish kumar liquor laws seizing house or vehicle