पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे रविवारी दुपारी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ केला. ही जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्य योजना असून जिचा ५० कोटीपेक्षा जास्त लोकांना फायदा होणार आहे. देशातील गरीब जनतेची सेवा करण्याच्या दिशेने उचलेले हे एक पाऊल आहे. त्यामुळे आयुष्मान योजना भारतासाठी ‘गेमचेंजर’ ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या योजनेबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.

सामान्य नागिरक वैद्यकीय उपचारापासून वंचित राहू नयेत, या उद्देशाने राबविण्यात येणार असलेल्या या योजनेच्या शुभारंभाबाबत मी पंतप्रधान मोदी यांचे आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो. या योजनेअंतर्गत कुटुंबाला पाच लाखापर्यंतचे उपचार पहिल्या वर्षभरासाठी मोफत मिळणार आहेत. ही योजना अत्यंत चांगली आहे आणि ही योजना राबवण्यात येत असल्याने मी खूप आनंदी आहे, असे नितीश कुमार म्हणाले.

आता श्रीमंतांप्रमाणे गरीबांनाही उपचार मिळतील. गरीबांनाही सर्व सुविधा मिळतील असे नरेंद्र मोदी यांनी योजनेचा शुभारंभ करताना सांगितले. काही जण या योजनेला मोदी केअर बोलतात पण ही गरीबांसाठीच योजना आहे असे मोदी म्हणाले. अमेरिका, कॅनडा आणि मॅक्सिको या तिन्ही देशांच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षा जास्त लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जगातील अनेक संघटना या योजनेचा अभ्यास करतील असे मोदी म्हणाले. १४५५५ या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करुन तुम्ही आयुष्मान भारत योजनेसंबंधी माहिती घेऊ शकता असे त्यांनी सांगितले.

ही योजना लाँच करताना आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा आणि झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास उपस्थित होते. मोदींनी त्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात या योजनेची माहिती दिली होती. एकाचवेळी ४४५ जिल्ह्यात ही योजना लागू झाली आहे.