मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी आरोपी याकुब मेनन याला सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात प्रतिक्रिया देणारे एमआयएमचे प्रमुख असादुद्दीन ओवेसी यांना वैशाली जिल्हा न्यायालयाने समन्स बजावले असून त्यांना ११ ऑगस्टपूर्वी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

उपविभागीय न्यायदंडाधिकारी राजेश पांडे यांनी ओवेसी यांना ११ ऑगस्टआधी न्यायालयात स्वत: हजर राहावे असा आदेश दिला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी ११ ऑगस्ट रोजी घेण्यात येईल. हाजीपूरचे वकील राजीव कुमार यांनी मागील वर्षी ३१ जुलै रोजी ओवेसी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. याकूब मेननला सुनावण्यात आलेल्या फाशीला ओवेसी यांचा विरोध होता.

माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि गुजरात दंगलीतील आरोपींनाही फाशी देण्यात आली नाही तर मग याकूबला फाशी का देता, असा सवालही ओवेसी यांनी उपस्थित केला होता. ओवेसी यांनी दूरचित्रवाहिन्यांच्या माध्यमातूनही न्यायालयाच्या निर्णयाला विरोध केला होता. त्यामुळे त्यांना समन्स बजावण्यात आली.