बिहार विधानसभेत २० फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री जितन राम मांझी हे विश्वासदर्शक ठराव मांडणार असून त्यापूर्वीच पक्षाच्या मुख्य प्रतोद पदावरून संघर्ष पेटला आहे. 

मांझी यांनी आपल्या समर्थक आमदाराची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे. त्याला सध्याचे मुख्य प्रतोद श्रावणकुमार यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. मांझी यांची ही कृती बेकायदेशीर असून आपणच प्रतोद पदावर कायम असल्याचा दावा श्रावणकुमार यांनी केला आहे.
नालंदा जिल्ह्य़ातील इस्लामपूर मतदारसंघातील आमदार राजीव रंजन यांची श्रावणकुमार यांच्याऐवजी पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र मांझी यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना पाठविले आहे.
तथापि, अध्यक्षांनी अद्याप त्याबाबत निर्णय घेतला नाही व त्याची अधिसूचनाही जारी केलेली नाही, असे रंजन यांनी सांगितले.