बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये अॅक्युट इन्सेफलायटिस सिन्ड्रोम (एईएस) या मेंदूज्वराने थैमान घातले असून यामध्ये मृत्यू झालेल्यांचा आकडा वाढला असून तो ८४वर पोहोचला आहे. यामध्ये सर्वाधिक लहान मुलांचा समावेश आहे. या आजाराची लागण रोखण्यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र, तरीही यावर नियंत्रण मिळवणे अवघड झाले आहे. दरम्यान, या बिकट परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मुझफ्फरपूरच्या तातडीच्या दौऱ्यावर असून या आजाराची माहिती घेत आहेत. दरम्यान, यावेळीही काही लहान मुलांनी मृत्यूला कवटाळल्याचे वृत्त आहे.


डॉ. हर्षवर्धन यांनी सर्वाधिक मृत्यू झालेल्या आणि या आजाराची लागण झालेले रुग्ण दाखल असलेल्या येथील श्रीकृष्ण मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाला भेट दिली आणि डॉक्टरांशी चर्चा केली. यावेळी रुग्णालयाकडून रविवारी आणखी तीन मुलांचा मृत्यू झाल्याचे डॉ. हर्षवर्धन यांना सांगितले. तसेच राज्याचे आरोग्य मंत्री सुरेश शर्मा यांनीही आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहोत. मात्र, रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने खाटा आणि आयसीयू सेवाही कमी पडत असल्याचे म्हटले आहे.

वाढत्या मृत्यूंमुळे मुझफ्फरपूरमध्ये आरोग्य तज्ज्ञांचे पथक दाखल झाले आहे. त्यांच्या निरिक्षणानुसार, या भागातील वाढते तापमान, हवेतील आर्द्रता आणि पाऊस नसल्याने लोकांचा हायपोग्लायसीमिया (शरीरातील साखर अचानक कमी होणे) यामुळे मृत्यू होत आहे. तर काही अहवालांनुसार, या आजाराचे कारण लीची हे फळ आहे. मुझफ्फरपूरच्या परिसरात पिकवल्या जाणाऱ्या लीची या फळामध्ये विषारी घटक आहेत, हे या मृत्यूला कारणीभूत ठरत आहे.


मुझफ्फरपूर भागात दरवर्षी या वातावरणातच या आजाराची लागण होत असते. प्रत्येकवेळी यामध्ये लहान मुलांचा मोठ्या प्रमाणावर बळी जात आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी येथील जनतेला कडक उष्णामुळे घराबाहेर पडू नये असा सल्ला दिला आहे. तीव्र उष्णतेमुळे त्याचा मेंदूवर परिणाम होतो आणि अनेक आजार बळावतात, असे त्यांनी म्हटले आहे.