गेल्या २० दिवसांपासून देशभरात पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढत आहेत. २० दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरात ९ रूपयांपर्यंतची तर डिझेलच्या दरात ११ रूपयांपर्यंतची वाढ झाली आहे. बिहारमध्ये याच वर्षी विधानसभेच्या निवडणुकाही पार पडणार आहेत. अशातच विरोधकांकडून पेट्रोल डिझेलच्या दरावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. विरोधीपक्ष नेते तेजस्वी यादव यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांसह आणि कार्यकर्त्यांसह सायकल मार्च काढत याचा विरोध केला होता. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुशील मोदी हे सरकारचा बचाव करताना दिसून आले. लॉकडाउनच्या ८२ दिवसांमध्ये तर पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर वाढवले नव्हते. तसंच यासंदर्भात जनतेमध्ये राग नाही, असं वक्तव्य करत त्यांनी सरकारचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.

सुशील मोदी यांनी यावेळी राष्ट्रीय जनता दलाच्या या आंदोलनाचा तीव्र शब्दात निषेध केला. “ज्या पक्षानं विकास आणि सेवेचा मार्ग सोडून राजकारणाला कमाईचं साधन बनवलं, ज्याचे युवराज महागड्या बाईक आणि गाड्यांचे चाहते आहेत, जे आपल्या बंगल्याच्या बाथरूममध्येही एसी लावतात ते पेट्रोल डिझेलच्या दरांचं गणित समजल्याशिवाय सायकलसोबत फोटो काढण्याशिवाय आणखी काय करू शकतात?,” असा सवालही त्यांनी केला. “ज्यांच्या गाड्यांमध्ये एसी बंद होत नाहीत ते आज पेट्रोल डिझेलच्या दरांवरून राजकारण करत आहेत,” असंही मोदी म्हणाले.

आणखी वाचा- पेट्रोल-डिझेलची दरवाढ कायम; जाणून घ्या नवे दर

सुशील मोदी यांच्या मते देशात लॉकडाउनच्या ८२ दिवसांपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही. तसंच जनतेतही याबाबत कोणताही राग नसल्याचंही ते म्हणाले. यूपीए सरकारपासूनच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्याची मुभा पेट्रोलियम कंपन्यांना देण्यात आली, असंही मोदी यांनी नमूद केलं.

डिझेलच्या दरात १० रूपयांपेक्षा अधिक वाढ

सध्या आंतरराष्ट्रीय स्तरारवर कच्च्या तेलाची किंमत कमी असली तरी देशांतर्गत बाजारात मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. सध्या इंडियन बास्केट कच्च्या तेलाच्या किंमतीत घट होऊन ते ४० डॉलर्स प्रति बॅरलच्या जवळपास आलं आहे. गेल्या २१ दिवसांमध्ये डिझेलच्या दरात १०.७९ रूपयांची आणि पेट्रोलच्या दरात ८.८७ रूपयांची वाढ झाली आहे.