बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांची बहीण रेखा मोदी यांनी रागाच्याभरात रेशन दुकानदाराला चावल्याची  घटना समोर आली आहे. शाब्दिक बाचाबाचीवरुन झालेलं भांडण एवढं वाढलं की या प्रकरणामध्ये पोलिसांना हस्ताक्षेप करावा लागला. मात्र त्यानंतर पोलीस स्थानकामध्येही रेखा मोदी यांनी बराच गोंधळ घातल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार रेखा मोदी यांनी पाटण्यामधील एका दुकानदाराकडून दोन पोती तांदूळ खरेदी केले होते. विकत घेतलेले दोन पोती तांदूळ घरी आणून देण्या सांगितलं होतं. मात्र काही कारणाने या दुकानदाराला तांदळाची पोती घरी पोहचवता आल्या नाहीत. या गोष्टीमुळे संतापलेल्या रेखा मोदी थेट दुकानात आल्या आणि त्यांचा दुकानदाराबरोबर वाद झाला.

जनसत्ताने स्थानिक प्रसारमाध्यमांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार रेखा मोदी आणि दुकानदारामधील वाद एवढा वाढला की रेखा यांनी दुकानदाराच्या हाताचा चावा घेतला. यानंतर हे प्रकरण थेट पोलिसांपर्यंत गेलं. पाटण्यामधील या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी रेखा आणि दुकानदार दोघांनाही पीरबहोर पोलीस स्थानकात नेलं. मात्र पोलीस स्थानकात आल्यानंतर रेखा यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या घटनेसंदर्भात समोर आलेल्या फोटोमध्ये रेखा यांना पोलीस स्थानकात घेऊन गेल्यानंतर त्या पोलीस स्थानकामध्येच जमिनीवर पडून निषेध करत होत्या. अनेक पोलीस कर्मचारी स्थानकामध्ये उपस्थित असतानाही रेखा या आरडाओरड करत होत्या. अनेकजण त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत असताना त्या मात्र गोंधळ घालत ओरडत सर्वांशी बोलत होत्या.

पोलिसांनी हे प्रकरण शांत करण्यासाठी दुकानदाराला रेखा मोदी यांनी दोन पोती तांदळासाठी देलेले पैसे परत करण्यास सांगितले. त्यानंतर रेखा थोड्या शांत झाल्या. रेखा या पीरबहोर पोलीस स्थानकाच्या हद्दीतच राहतात. रेखा आणि सुशील मोदी हे चुलत भावंडे आहेत. मात्र यापूर्वी अनेकदा सुशील मोदींनी रेखाबरोबर आपलं काहीच नातं नसल्याचं सांगितलं आहे. मात्र आता या प्रकरणानंतर पीरबहोर परिसरामध्ये या घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे.