बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सोमवारी बिहारमधील लौरियाचे भाजप आमदार विनय बिहारी यांना घालण्यासाठी कुर्ता-पायजामा भेट दिला. विनय बिहारी हे गेल्या चार महिन्यांपासून कुर्ता पायजामा घालत नाहीत. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी आपल्या मतदारसंघात रस्ते निर्मिती करण्याचे वचन दिले होते. जोपर्यंत रस्त्यांची कामे सुरू होत नाहीत तोपर्यंत फक्त हाफ पँट आणि बनियान घालणार असा पण केला होता. त्यामुळे ते हाफ पँट आणि बनियान या वेशातच विधानसभेत येत असत. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राज्य मार्ग निर्मिती विभागाचे मंत्री तेजस्वी यादव यांनी सोमवारी विनय बिहारी यांची भेट घेतली आणि त्यांच्या मतदारसंघातील ३७ किमी. रस्त्यांच्या कामासाठी ८० कोटींच्या निधीची तरतूद केली. त्यानंतर तेजस्वी यादव यांनी स्वत: आपल्या हातांनी विनय बिहारी यांना कुर्ता आणि पायजामा घातला.

गत चार महिन्यांपासून बिहारी हे बनियान आणि हाफ पँटवर येत असत. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी दंडवत घेत सदन गाठले होते. विधानसभेतील कामकाजात त्यांना सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. आता रस्त्याच्या कामासाठी निधी व स्वत:ला कुर्ता-पायजामा मिळाल्यामुळे ते आता विधानसभेच्या कामकाजात सहभाग नोंदवू शकतात. विनय बिहारी हे बिहारचे माजी सांस्कृतिक मंत्री आहेत. ते म्हणाले, जोपर्यंत आपल्या मतदारसंघात रस्ते बनवले जात नाही. तोपर्यंत गांधीजी प्रमाणे आपण जीवन व्यतीत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विनय बिहारी यांनी ४४ किमी लांब रस्ता बनवण्याचे अपील केले होते. यासाठी त्यांनी अनेकवेळा पत्रं लिहिली होती. या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आली आहे. २६ नोव्हेंबर २०१३ रोजी एका रॅलीत मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी या रस्त्यांना राज्य महामार्गाचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर अनेक महिने उलटूनही या घोषणेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.