अभिनेता सुशांत सिंह राजूपत आत्महत्या प्रकरणावरून चौकशीचं राजकारण चांगलंच तापलं आहे. बिहार पोलिसांनी मुंबईत येऊन तपास करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर बिहार सरकारनं हे प्रकरण सीबीआयकडे सोपवल्यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांचा समाचार घेतला होता. राऊत यांनी केलेल्या टीकेला पांडे यांनी ट्विट करून उत्तर दिलं आहे.

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाच्या तपासामागे राजकारणअसल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘रोखठोक’ सदरातून केला होता. त्याचबरोबर बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांच्या भूतकाळावर प्रकाश टाकत राऊत यांनी टीका केली होती. राऊत यांनी केलेल्या टीकेला पांडे यांनी ट्विट करून उत्तर दिलं आहे. “आयुष्यभर निष्पक्ष राहुन निष्ठेनं सर्वसामान्यांची सेवा केली आहे. माझ्यावर खूप सारे तथ्य नसलेले आरोप लावण्यात येत आहेत. ज्यांचं उत्तर देणं योग्य होणार नाही. परेश्वर प्रत्येकाचं रक्षण चांगल्या पद्धतीनं करतो. हवा पण वाहत राहते, दिवा पण जळत राहतो. मला जितक्या हव्या तितक्या शिव्या द्या, पण सुशांतला न्याय मिळावा,” असं गुप्तेश्वर पांडे यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

“बिहारचे राज्य पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे हे मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी वृत्तवाहिन्यांवर खाकी वर्दीत जाऊन तावातावात बोलतात. अर्णब गोस्वामी यांच्या वृत्तवाहिनीवरील चर्चेत ते सहभागी होतात. हा सरळसरळ पोलिसी शिस्तभंग आहे. पुन्हा या गुप्तेश्वर पांडे यांच्याकडून शिस्त पाळण्याची अपेक्षा तरी का करावी? हे गुप्तेश्वर पांडे कोण? 2009 साली ते डीआयजी असताना पोलीस सेवेचा राजीनामा देऊन थेट राजकारणात उतरले. विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर ‘बक्सर’ मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी उभे राहिले. पण भाजपचे खासदार लालमुनी चौबे यांनी बंडखोरी करण्याची धमकी देताच चौबे यांचीच उमेदवारी पुन्हा कायम ठेवली. त्यामुळे गुप्तेश्वर पांडे हे मधल्या मध्ये लटकले. ‘ना घर के ना घाट के’ अशी त्यांची अवस्था झाली. अशा तऱ्हेने राजकारणात घुसण्याचे त्यांचे मिशन फेल गेले. त्यानंतर त्यांनी पुन्हा सेवेत रुजू होण्यासाठी अर्ज विनंत्या केल्या. असे सांगतात की, गुप्तेश्वर पांडे यांच्या पत्नीनेही पतीच्या वतीने सरकारकडे अर्ज केला व नोकरी सोडताना आपले पती गुप्तेश्वर पांडे यांची मानसिक स्थिती चांगली नव्हती, असे सांगितले. मानसिक स्थिती चांगली नव्हती याच आधारावर त्यांना पुन्हा सेवेत घेतले असेल तर तो बिहार सरकारचा प्रश्न. पांडे हे तेव्हा भाजपच्या तंबूत होते व आज नितीश कुमार यांचे खास आहेत. भाजपकडून उमेदवारी स्वीकारलेले पांडे यांनी मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करणे हास्यास्पद आहे. पुन्हा आता असे वृत्त बिहारातील वर्तमानपत्रांनी छापले आहे की, हे पांडे बिहारातून उद्याची विधानसभा लढण्याची तयारी करीत आहेत. तेथील वृत्तपत्रांतील बातम्यांनुसार पांडे शाहपूर विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवू शकतात. या भागातील जातीय समीकरणांचा पांडे यांना लाभ होऊ शकतो, असे गणित मांडले जात आहे. अद्यापि त्यांचा सेवाकाळ सहा महिने बाकी आहे. मात्र ते राजीनामा देऊ शकतात आणि जदयूच्या तिकिटावर बक्सर सदर किंवा शाहपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात असेही या बातम्यांमध्ये म्हटले आहे. अशा पोलिसाकडून समाजाने काय अपेक्षा ठेवायची?,” अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.