बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेशवर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला आहे. तडकाफडकी घेतलेल्या या निर्णयामुळे गुप्तेश्वर पांडे बिहार विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र गुप्तेश्वर पांडे यांनी या सर्व अफवा असल्याचं सांगत वृत्त फेटाळून लावलं आहे. बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान निवडणूक होणार आहे. यावेळी त्यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी आपल्या स्वेच्छानिवृत्तीचा काही संबंध नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

बिहार निवडणुकीआधी DGP पांडेंनी घेतली VRS; NDA च्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची शक्यता

“मी आता डीजीपी राहिलेलो नाही. त्यामुळे आता माझ्यावर सरकारी बंधनं नाहीत. बक्सर, जेहानाबाद, बेगुसराई आणि इतर अनेक जिल्ह्यांमधून लोक मला भेटण्यासाठी येत आहेत. कशा पद्धतीने त्यांची सेवा करुन शकतो याबद्दल मी त्यांच्याशी चर्चा करुन नंतर निर्णय घेणार,” असं गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं आहे. “निवडणूक लढणार असं मी कधी सांगितलं,” अशी विचारणा गुप्तेश्वर पांडे यांनी केली. गुप्तेश्वर पांडे यांनी याआधी २००९ मध्येही लोकसभा निवडणूक लढण्यासाठी स्वचेछानिवृत्ती घेतली होती.

“मी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केलेला नाही. जेव्हा मी करेन तेव्हा मी सांगेन. पण लोकांची सेवा करण्यासाठी राजकारण हा एकमेव मार्ग नाही,” असं गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी गुप्तेश्वर पांडे यांच्यावर टीका केली असून हे खूप मोठं षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. “महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी तसंच राष्ट्रीय महत्त्व कमी करण्यासाठी हे भाजपाचं घाणेरडं षडयंत्र आहे. बिहारच्या डीजीपींचा यासाठी वापर करण्यात आला असून आता त्यांना बक्षीस दिलं जात आहे. त्यांची स्वेच्छानिवृत्ती सर्व काही सांगून जाते. भाजपाला सुशांतसाठी कोणतीही सहानुभूती नव्हती. बिहार निवडणूक आणि नव्या फिल्मसिटीसाठी त्यांनी राजकीय वापर करण्याची संधी म्हणून याकडे पाहिलं,” असं सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान गुप्तेश्वर पांडे यांची स्वेच्छानिवृत्तीची विनंती राज्यपालांनी मान्य केली आहे. गुप्तेश्वर पांडे १९८७ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी होते. सुशांत सिंह प्रकरणामुळे सध्या ते चर्चेत आले होते.