गुन्हेगार कोणत्याही जातीचा धर्माचा आणि गटाचा असला तरी तो गुन्हेगार असतो. तो केवळ एका विशिष्ट जातीचा, धर्माचा किंवा समुदायाचा असल्याने त्याला हिरो बनवू नका. असं करुन तुम्ही प्रशासनाला आणि पोलीस यंत्रणेला दुबळं बनवत आहात, असा संताप बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी व्यक्त केला आहे.  कानपूरमधील बिक्रू खेडय़ात विकास दुबे याच्या टोळीवर जो छापा टाकताना झालेल्या चकमकीत पोलीस उपअधीक्षकासह आठ पोलिसांना जीव गमावावा लागला आहे. सध्या उत्तर प्रदेश पोलीस विकास दुबेचा शोध घेत असतानाच दुसरीकडे या प्रकरणावरुन पोलिसांसहीत प्रशासनावरही टीका होत आहे. याचसंदर्भात दुबे बिहारमध्ये आल्यावर त्याचं काय करणार असा प्रश्न विचारला असता बिहारच्या डीजीपींनी आरोपीला हिरो बनवणं थांबत नाही तोपर्यंत गुन्हेगारी संपवता येणार नाही असं मत व्यक्त केलं आहे.

तो इथून सुरक्षित कसा जाईल?

दुबे सारख्या गुन्हेगारांची पाठराखण केली जाते ही लज्जास्पद गोष्ट असल्याचे पांडे यांनी म्हटलं आहे. “बिहार पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलीस वेगळे आहेत का? संपूर्ण देशातील पोलीस खातं एक एकच आहे. उत्तर प्रदेशमध्ये आठ पोलिसांची हत्या करुन तो (विकास दुबे) बिहारमध्ये पळून येईल आणि इथून सुरक्षित निघून जाईल? असं कसं होईल?,” असा प्रश्नच पांडे यांनी बिहारमध्ये आल्यावर दुबे सुरक्षित असल्याचे बोलले जात आहे या प्रश्नाला उत्तर देताना उपस्थित केला.

गुन्हेगारांना लोकं हिरो बनवतात आणि…

“एका व्यक्तीने त्याला (विकास दुबेला) विशिष्ट जातीचा सेवक असल्याचे सांगितले. हे लज्जास्पद आहे. हीच वृत्ती गुन्हेगारी संस्कृतीला खतपाणी घालते. आपल्या आपल्या जातीच्या लोकांना यामध्ये अगदी चोऱ्यामाऱ्या करणारे, बलात्कार करणारे, अपहरण करणाऱ्यांना, हत्या करणाऱ्यांना लोकं हिरो बनवत आहेत. अशाप्रकारे आपल्या जातीच्या गुन्हेगारांना लोकं हिरो बनवू लागले, हार घालू लागले, त्यांची पुजा करु लागले तर अपराधी वृत्ती वाढत जाणार. अशाप्रकारे चुकीच्या व्यक्तींना हिरो बनवून तुम्ही प्रशासनाला, शासनाला आणि पोलिसांनी दुबळं करत आहात,” अशा शब्दांमध्ये दुबेची पाठराखण करणाऱ्यांना डीजीपींनी सुनावले.

तो शेर तर पोलीस उंदीर आहेत का?

“तुम्ही जर त्या विकास दुबेला शेर (धाडस करणारा) म्हणत असाल तर जे आठ पोलीस मारले गेले ते काय उंदीर होते का? आरोपी आणि गुन्हेगार आता शेर होऊ लागलेत. आता बिहारमध्ये आम्ही त्याला दाखवतो की आम्ही अशा सिंहांची शिकार कशी करतो,” अशा शब्दांमध्ये पांडे यांनी दुबेला बिहार पोलीस सोडणार नाही असा इशारा दिला आहे.

मग क्रांतीकारी कोण होते?

“दुबेसारख्या गुन्हेगारांना सिंहाची उपमा देत असाल तर स्वातंत्र्य लढ्यामध्ये लढलेले क्रांतीकारी कोण होते?, या प्रश्नाचे उत्तरही गुन्हेगारांची पाठराखण करणाऱ्यांनी द्यावं,” असंही पांडे यांनी म्हटलं आहे. “देशासाठी तसेच समाजासाठी जगणारे आणि त्यासाठी प्राणांची आहुती देणारे खरे शेर असतात. गुन्हेगार कोणत्याही जातीचा, धर्माचा किंवा गटाचा असला तरी तो केवळ गुन्हेगार असतो. काही लोकं या गुन्हेगारांना हिरो बनवत आहेत हे लज्जास्पद आहे,” असंही पांडे म्हणाले आहेत.

सर्वांना मिळून गुन्हेगारी संपवावी लागेल

गुन्हेगारी संस्कृतीविरोधात सर्व जनतेला एकत्र लढावं लागेल. गुन्हेगारी केवळ पोलीस संपवू शकत नाही. त्यामुळेच गुन्हेगार हा कोणत्याही जातीचा, धर्माचा किंवा गटाचा असो त्याला हिरो बनवू नका, त्याला सन्मान देऊन नका, त्याला पाठीशी घालू नका, असं आवाहनही पांडे यांनी केलं आहे.