आधुनिक युगात मोबाईल हा जीवनावश्यक भाग झाला आहे. मोबाईलमध्ये तासंतास तरुणाई गुंतलेली दिसते. सोशल मीडियावर फोटो, मीम्स आणि चॅटींग करण्यात तरुणाई मग्न असते. मात्र बिहार पोलिसांना कर्तव्यावर असताना मोबाईल, टॅब आणि सोशल मीडिया वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. बिहार पोलीस महासंचलाकांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. या आदेशात कर्तव्यावर असताना अनावश्यक मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.

पोलीस महासंचालक एसके सिंघल यांनी याबाबतचं एक पत्रक जारी केलं आहे. तसेच आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाईचे आदेश दिले आहेत. गेल्या काही दिवसात पोलीस अधिकारी कर्तव्यावर असताना मोबाईलमध्ये मग्न असल्याची बाब समोर आली होती. ही बाब खटकल्याने पोलीस महासंचालकांनी आदेश जारी केला आहे.

पोलीस अधिकारी आणि शिपाई हे कर्तव्यावर असताना त्यांचं लक्ष मोबाईलमध्येच असल्याचा अनेक तक्रारी पोलीस मुख्यालयात प्राप्त झाल्या होत्या. एकमेकांना मॅसेज पाठवणं आणि सोशल मीडियात गुंतून राहत असल्याने पोलिसांचं कामावरही दुर्लक्ष होत होतं. नाकाबंदीवेळीही हीच स्थिती असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे पोलिसांच्या प्रतिमेला तडा जात असल्याची बाब पोलीस महासंचालकांनी जारी केलेल्या पत्रकात नमूद केली आहे. समाजाला पोलिसांकडून अपेक्षा असतात मात्र कामात दुर्लक्ष झाल्यास गुन्हेगारी वाढू शकते ही बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली.

कोशिंबीरीसाठी घेतला पत्नीचा जीव; उत्तर प्रदेशमधील अंगावर काटा आणणारी घटना

पोलीस अधिकारी आणि शिपाई यांना कर्तव्यावर असताना मोबाईल वापरण्यास मनाई असली तरी विशेष परिस्थितीत मुभा देण्यात आली आहे. या आदेशाची प्रत सर्व पोलीस कार्यालयात पाठवण्यात आली आहे. आदेशाचं पालन न केल्यास कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.