बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकींची जोरदार तयारी सुरु आहे. प्रचारसभा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यापासून ते अगदी केंद्रीय मंत्र्यांपर्यंत अनेकजण या प्रचारामध्ये उतरल्याचे चित्र दिसत आहे. सोमवारी नितीश कुमार यांच्या अशाच एका प्रचारसभेमध्ये एक विचित्र प्रकार घडला. बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील रफीगंज येथे मुख्यमंत्र्यांची प्रचारसभा सुरु होती. मुख्यमंत्री मतदारांना संबोधित करत असतानाच अचानक समोरच्या गर्दीमधून एकजण, “नितीश कुमार चोर है, नितीश कुमार चोर है। मनरेगा का पैसा खाया है।” अशा घोषणा देऊ लागला. त्यावेळी पोलिसांनी आणि जनता दल युनायटेडच्या कार्यकर्त्यांनी या व्यक्तीला समजवण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारामुळे सभेमध्ये काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. अखेर पोलिसांनी या व्यक्तीला सभेच्या ठीकाणाहून बाहेर नेलं आणि सभा पुन्हा सुरु झाली. महारेगासंदर्भातील  (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) कामांबद्दल या व्यक्तीची नाराजी असल्याचे समजते.

नक्की पाहा >> Video: पत्रकाराने विचारलं, “तुमच्या गावात विकास पोहचलाय का?”; आजोबांनी दिलेलं उत्तर झालं व्हायरल

नितीश यांच्या सभेमध्ये झालेल्या या गोंधळादरम्यान मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या व्यक्तीला काही कागदपत्र मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवायची होती. मात्र जदयुच्या कार्यकर्त्यांनी त्याला पुढे केही बोलू दिलं नाही. त्यामुळेच या व्यक्तीने मोठ्याने आरडाओरड करुन घोषणा देण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री नितीश कुमार मंचावरुन हा सर्व प्रकार पाहत होते. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या व्यक्तीला जो कागद माझ्यापर्यंत पोहचवायचा आहे तो त्याच्याकडून घ्या आणि त्याच्याशी शांतपणे चर्चा करा, असं पोलिसांना सांगितलं.

नितीश कुमार यांनी या सभेमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर टीकास्त्र सोडताना १० लाख नोकऱ्यांच्या आश्वासनावरुन निशाणा साधला. “काही लोकं काहीही माहिती नसताना नोकऱ्या देण्याची आश्वासने देत आहेत. एवढ्या नोकऱ्या देण्यासाठी पैसे कुठून येणार. नोकऱ्या देण्याच्या नावाखाली या लोकांनी आपला स्वत:चा वेगळाच काम धंदा चालू करु नये. केवळ बोलून काही होत नाही. प्रत्यक्ष कृती करताना अनुभव येतात. विषयाचे ज्ञान असेल तर समजेल,” असं टोला नितीश यांनी लगावला. तसेच लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांच्यावरही नितीश यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधाला. १५ वर्ष तुम्ही पती पत्नीने राज्य कसं ठेवलं ते पाहिलं. त्याच्या कालावधीमध्ये लोकांनी संध्याकाळी पाचनंतर घराबाहेर पडणं सोडून दिलं होतं. उद्योग व्यवसाय भीतीमुळे राज्यातून निघून गेले. अपहरणाचे उद्योग सुरु झाले. मात्र तुम्ही आमच्या हाती सत्ता देऊन न्याय देण्याची व्यवस्था अधिक मजबूत केली. आता तुम्हालाच निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला काय हवं आहे, असं आवाहन नितीश यांनी या सभेमध्ये केलं.