सध्या बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. गुरूवारी बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. यादरम्यान, एक महत्त्वाची बाब समोर आहे आहे. पहिल्या टप्प्यात पार पडलेल्या निवडणुकांमध्ये उभ्या असलेल्या १०६६ उमेदवारांपैकी ३७५ उमेदवार हे कोट्यधीश असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या काही उमेदवारांकडे ब्रिटनच्या पंतप्रधानांपेक्षाही अधिक संपत्ती असल्याचं म्हटलं जात आहे.

एडीआरनं सादर केलेल्या आकडेवारीनुसार बिहारमधील ३७५ म्हणजेच एकूण ३५ टक्के उमेदवार हे कोट्याधीश आहेत. सर्व उमेदवारांची सरासरी संपत्ती १.९९ कोची रूपये इतकी आहे. त्यापैकी ९ टक्के उमेदवारांची संपत्ती ५ कोटी रूपयांपेक्षा अधिक तर १२ टक्के उमेदवारांची संपत्ती २ ते ५ कोटी रूपयांच्या दरम्यान आमि २८ टक्के उमेदवारांची संपत्ती २ कोटी रूपयांपर्यंत आहे.

दुसऱ्या टप्प्यातील ४९५ उमेदवार कोट्यधीश

एडीआरच्या आकडेवारीनुसार बिहार निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांपैकी ४९५ उमेदवार हे कोट्यधीश आहेत. त्यापैकी ११८ उमेदवारांकडे ५ कोटी आणि त्यापेक्षा अधिक संपत्ती आहे. भाजपाचे ४६ पैकी ३९, तर आरजेडीचे ५६ पैकी ४६, जदयूचे ४३ पैकी ३५ तर एलजेपीचे ५२ पैकी ३८, काँग्रेसचे २४ पैकी २० आणि बसपाचे ३३ पैकी ११ उमेदवार कोट्यधीश आहेत. दुसऱ्या टप्प्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार हे काँग्रेसचे संजीव सिंह आहेत. त्यांच्याकडे ५६ कोटी रूपयांपेक्षा अधिक संपत्ती आहे.

दरम्यान, यावेळी लालू प्रसाद यादव यांचे धाकटे चिरंजीव तेजस्वी यादव यांच्या नावाचीही अधिक चर्चा आहे. तेजस्वी यादव हे रागोपूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याकडे सध्या ५.८८ कोटी रूपयांची संपत्ती आहे. २०१५ च्या तुलनेत ५ वर्षांमध्ये त्यांच्या संपत्तीत २ कोटींची वाढ झाली आहे. तर त्यांचे ज्येष्ठ बंधू तेजप्रताप यादव यांच्याकडे २.८ कोटी रूपयांची संपत्ती आहे.