25 November 2020

News Flash

चिराग पासवान यांचा भाजपा उमेदवारांना पाठिंबा; बिहारच्या मतदारांना केलं आवाहन

बिहार विधानसभा निवडणूक २०२०

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नितीश कुमार यांच्या नेतृत्वाला विरोध करत एनडीएतून बाहेर पडलेल्या लोक जनशक्ती पार्टीनं मतदान काही दिवसांवर असताना भाजपा उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. लोजपाचं अध्यक्ष चिराग पासवान यांनी बिहारच्या मतदारांना तसं जाहीर आवाहन केलं आहे. चिराग पासवान यांनी केलेल्या या ट्विटमुळे पुन्हा एकदा भाजपा-लोजपातील छुप्या युतीच्या चर्चेला तोंड फुटलं आहे.

लोजपानं स्वबळाचा नारा दिल्यानंतर ही भाजपाचीच खेळी असल्याचं बोललं जात होतं. मात्र, भाजपाकडून हे सातत्यानं नाकारलं जात आहे. असं असतानाच लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात लोजपाचे उमेदवार नाहीत. तिथे भाजपा उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन चिराग पासवान यांनी लोजपा समर्थकांसह मतदारांना केलं आहे.

पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच चिराग पासवान यांनी ट्विट करत नितीश कुमार यांना आव्हान दिलं आहे. तर आपण भाजपासोबतच असल्याचंही स्पष्ट केलं आहे. “आपल्या सगळ्यांना आवाहन आहे की, ज्या ठिकाणी लोजपाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्या सर्व ठिकाणी बिहार प्रथम, बिहारी प्रथम लागू करण्यासाठी लोजपा उमेदवारांना मतदान करावं व अन्य ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मतदान करावं. येणारं सरकार नितीशमुक्त सरकार बनेल,” असं आवाहन चिराग पासवान यांनी समर्थकांसह मतदारांना केलं आहे.

विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीपासूनच चिराग पासवान हे नितीश कुमार यांना विरोध करत होते. त्यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशीही चर्चा केली होती. मात्र, त्यानंतर नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यास नकार देत चिराग पासवान यांनी थेट स्वबळाचा नारा दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 5:05 pm

Web Title: bihar election bihar assembly election chirag paswan support to bjp candidate bmh 90
Next Stories
1 …तर नितीश कुमार गजाआड असतील – चिराग पासवान
2 दिशाभूल करायला आम्ही लहान मुलं नाही; ओवेसींची सरसंघचालक भागवत यांच्यावर टीका
3 नेपाळच्या पंतप्रधानांनी जनतेला दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा; मात्र अडकले वादाच्या भोवऱ्यात
Just Now!
X