बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात यावेळी नेहमीप्रमाणे रंगत दिसणार नसली, तर राजकीय आरोप मात्र शिगेला पोहोचले आहेत. महाआघाडी आणि एनडीए यांच्या शाब्दिक युद्ध सुरू झालं असून, एका कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपा व जदयूकडून तेजस्वी व तेजप्रताप यादव यांच्यावर टीका होत आहे. या टीकेला उत्तर देताना तेजस्वी यादव यांनी खेळलेल्या चालीमुळे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात राजकीय कार्यकर्ते शक्ती मलिक यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात राजदचे नेते व बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह त्यांचे बंधू तेजप्रताप यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर विरोधकांनी राजद व तेजस्वी यादव यांच्या टीका करण्यास सुरूवात केली आहे. विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवर अखेर तेजस्वी यादव यांनी मौन सोडत थेट मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र लिहिलं आहे.

“काही दिवसांपूर्वी पूर्णिया जिल्ह्यात सामाजिक व राजकीय कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. मला त्याची उशिरानं माहिती मिळाली. कायदा आपलं काम करत आहेत. पण, तुमचे नेते आणि प्रवक्ते निराधार टीका करत आहेत. आपल्या सरकारची जशी भूमिका राहिली आहे, त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करावी. ही कारवाई प्रभावित करण्यासाठी सत्तेत बसलेले लोक स्वतंत्र आहेत. तुमचेच लोक बिहार पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. पीडित कुटुंबाला न्याय मिळावा व या प्रकरणातील सत्य लवकर बाहेर यावं, या उद्देशानं मी तुम्हाला विनंती करतो की या प्रकरणाची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तपास यंत्रणाकडून चौकशी करण्याची शिफारस केली जावी. गृहमंत्री म्हणून तुम्ही मला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अटक करून चौकशीसाठी बोलवू शकता,” असं म्हणत तेजस्वी यादव यांनी नितीश कुमारांवर टीकास्त्र डागलं आहे.

हत्येचं कारण आलं समोर?

शक्ती मलिक यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून हत्येचा कारणाचा उलगडा झाला. पोलीस अधीक्षक विशाल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की शक्ती मलिक व्याजानं पैसे देण्याचं काम करायचे. वेळेवर पैसे न दिल्यास त्यांना त्रासही द्यायचे. आफताब यांनाही शक्ती मलिक यांनी पैशांसाठी छळ केला होता. त्यामुळे आफताब यांनी अन्य आरोपींसोबत मिळून शक्ती मलिक यांची हत्या केली,” असं शर्मा यांनी सांगितलं.