बिहार विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून, त्यापूर्वीच राजकीय पडझड सुरू झाली. याचा पहिला झटका मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल (जदयू) पक्षाला बसला आहे. जदयूचे नेते आणि मंत्रिमंडळात उद्योगमंत्री असलेले श्याम रजक यांची जदयूतून हकालपट्टी करण्यात आली असून, त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. रजक हे आज लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलात प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जदयू नेते श्याम रजक पक्ष सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. आज (१७ ऑगस्ट) मंत्रिपदाचा राजीनामा देऊन राजदमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रजक यांना एक दिवस आधीच मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला. नितीश कुमार यांच्या प्रस्ताव राज्यपालांनी मंजूर केला. त्यानंतर रजक यांनी आज आमदारकीचाही राजीनामा दिला.

दरम्यान, राजदचे नेते तेजस्वी यादव आज पत्रकार परिषद घेणार असल्याचं वृत्त आहे. या पत्रकार परिषदेतच श्याम रजक हे राजदमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. मागील काही दिवसांपासून रजक हे राजद नेत्यांच्या संपर्कात होते. जदयूमधून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर श्याम रजक यांनी भूमिका मांडली आहे. “आपली हकालपट्टी करण्यात आली नाही, तर आपण स्वत विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिला. तिथे सामाजिक न्याय हिरावून घेतला, तिथे आपण राहू शकत नाही,” असं रजक यांनी म्हटलं आहे.

श्याम रजक हे सध्या जदयूमध्ये असले तरी एकेकाळी ते राजदचे नेते लालू प्रसाद यादव यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जायचे. राबडी देवी यांच्या नेतृत्त्वाखालील बिहार सरकारमध्ये रजक यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं होतं. जदयूमध्ये दुर्लक्ष होत असल्यानं रजक हे नाराज असल्याचं बोललं जात होतं.