बिहार विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. त्यामुळे आता प्रचारावर भर दिला जात असून, भाजपानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ८ सभा आयोजित केल्या आहे. मोदींच्या सभा व्हर्च्युअल होणार असून, त्यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. मोदींचं भाषण घराघरात पोहोचवण्यासाठी स्मार्ट फोनसह पक्षाचे चार लाख कार्यकर्ते आणि १० हजार सोशल मीडिया कंमाडोज सज्ज झाले आहेत.

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कमीत कमी आठ रॅलीचं नियोजन सुरू आहे. १५ ऑक्टोबरनंतर या रॅली आयोजित केल्या जाणार आहेत. मात्र, ही संख्या एका डझनपर्यंत जाऊ शकते. करोनामुळे रॅली आयोजित करतात येत नाही. त्यामुळे पंतप्रधानांचा संदेश पोहोचवण्यासाठी दुसरा मार्ग शोधावा लागला, असं सूत्रांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषण बिहारच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया कंमाडोज आणि चार लाख स्मार्टफोन वॉरियर्सवर जबाबदारी देण्यात आलेली आहे. ते या सभा लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत.

भाजपाचे नेते म्हणाले भारत-चीन सीमेवरील तणाव आणि आर्थिक मंदी यामुळे लोक चिंतेत आहे. तशा प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी हे थेट मतदारांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचं आहे. “पंतप्रधान याविषयावर बोलणारे सर्वात विश्वासार्ह नेते आहेत. ते केंद्र सरकारच्या कार्यक्रमाबद्दलही बोलणार आहेत. थेट लाभहस्तांतरणातंर्गत असणाऱ्या योजनांचे लाभार्थी बिहारमधील आहेत,” असं ते म्हणाले.

बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी २८ ऑक्टोबरला मतदान होत आहे. त्यानंतर ३ नोव्हेंबरला दुसऱ्या आणि ७ नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ७१, दुसऱ्या टप्प्यात ९४ आणि तिसऱ्या टप्प्यात ७८ जागांवर मतदान होणार आहे. तर १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.