बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असला तरी, सत्ताधारी जनता दल (यू)-भाजप आघाडीत पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीच्या सहभागाबाबत अद्यापही अनिश्चितता असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर बिहारमधील एनडीएचा चेहरा व विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. बिहार निडणूक कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतरच्या पहिल्याच पत्रकारपरिषदेत त्यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले.

लोक जनशक्ती पार्टी ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये(एनडीए) असणार की नाही, याबाबतचा निर्णय भाजपाला घ्यायचा आहे. असं नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. शिवाय, त्यांनी यावेळी हे देखील म्हटलं की ते रामविलास पासवान यांचा आदर करतात, एवढंच नाहीतर ते आपल्या विरोधकांचाही आदर करत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.

आणखी वाचा- उठो बिहारी, करो तयारी…. अबकी बारी; लालुंनी दिली ‘ही’ घोषणा

यावेळी नितीश कुमार यांना जेव्हा लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी केलेल्या टिप्पणीबद्दल विचारले गेले, तेव्हा त्यांनी आपण या सर्व गोष्टींकडे लक्ष देत नाही व परवा देखील करत नसल्याचे म्हटले. यावरून नितीन कुमार यांनी एकप्रकारे लोक जनशक्ती पार्टी एनडीएमध्ये असेल की नाही याबाबत आता भाजपावरच निर्णय सोपवला असल्याचे दिसत आहे.

बिहार विधानसभेची निवडणूक २८ ऑक्टोबर, ३ आणि ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून १० नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाईल. करोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक आहे.

आणखी वाचा- करोना काळ असला तरीही बिहार पुन्हा जिंकणारच, देवेंद्र फडणवीस यांचा दावा

जागावाटप अनुत्तरित
बिहारमधील विधानसभा निवडणुकीत जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी उभी राहिली आहे. नितीशकुमार चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदावर दावा करत असून त्यासाठी बिहारचा विकास आणि राज्याची अस्मिता या दोन मुद्दय़ांवर प्रामुख्याने प्रचारात भर असेल. तर महाआघाडीच्यावतीने शेती विधेयके, पूरपरिस्थिती, बेरोजगारी, स्थलांतरित मजुरांचा प्रश्न, करोनाची हाताळणी असे मुद्दे नितीशकुमार यांच्या विरोधात वापरले जातील. एनडीमध्ये रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष व जितन मांझी यांचा हिंदुस्थान अवामी मोर्चाही सहभागी असेल. त्यामुळे एनडीएतील जागावाटपाचा प्रश्न अजून सुटलेला नाही. गेल्या वेळी २०१५मध्ये नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी आघाडी करून सत्ता मिळवली होती. त्यात लालूंच्या पक्षाला सर्वाधिक ८० जागा मिळाल्या होत्या. जनाता दल ७१, भाजप ५३ तर काँग्रेस २७ जागा मिळाल्या होत्या.

बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम काल केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. फेब्रुवारीमध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर, करोनाच्या आपत्तीमुळे जग पूर्ण बदलून गेले असून, नव्या परिस्थितीत आयुष्यातील घडामोडींचा विचार करावा लागत आहे. त्या दृष्टीने बिहारमधील निवडणूक ही जगभरातील मोठी निवडणूक असेल. लाखो विद्यार्थ्यांनी नीट आणि जेईई परीक्षा दिल्या आहेत. लोकांचे आरोग्य सांभाळून लोकप्रतिनिधींची निवडप्रक्रिया पार पाडण्यासाठी मार्ग काढावा लागत आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले. जगभरात ७० देशांनी निवडणुका रद्द केल्या असल्याची माहितीही त्यांनी दिली.