बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव कुटुंबीयांकडून रोज एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. माजी उपमुख्यमंत्री व लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांनी आज (बुधवार) पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. आरजेडीची साथ सोडून भाजपचा पाठिंबा घेतल्यावरून तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका करत त्यांनी महात्मा गांधींना धोका दिल्याचा आरोप केला. आरजेडी आजपासून ‘भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ भगाओ’ आंदोलन सुरू करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

महात्मा गांधींची कर्मभूमी चंपारण येथून तेजस्वी यादव यांनी त्यांचे भाऊ माजी आरोग्य मंत्री तेजप्रताप यादव यांनी ‘जनादेश अपमान’ यात्रेला प्रारंभ केला. त्या वेळी ते बोलत होते. या यात्रेकडून यादव कुटुंबीयाला मोठ्या आशा आहेत. नितीश कुमार यांनी जनादेशाचा अपमान केल्याचा आरोप यादव यांच्याकडून सातत्याने केला जात आहे. नितीश कुमार यांच्याविरोधात वातावरण तयार करण्यासाठी आरजेडीकडून ही यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेच्या माध्यमातून तेजस्वी यादव संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहेत. या यात्रेदरम्यान लोकांना जनादेशाच्या अपमानाची माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, जेडीयूने तेजस्वी यादव यांनी न्यायालयाची यात्रा सुरू केली पाहिजे, असा टोला लगावला होता.

नितीशकुमार यांचं वय आता ६५ च्या पुढे आहे, त्यांनी आता राजकारणातून संन्यास घेतला पाहिजे अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली होती. नितीशकुमार यांनी ५० वर्षांपुढे वय असलेल्या आणि चांगलं काम न करणाऱ्या शिक्षकांचे राजीनामे सक्तीनं घेतले होते, आता नितीशकुमार स्वतः ६५ वर्षांच्या वरच्या वयाचे आहेत मग त्यांनी राजीनामा का देऊ नये? असा प्रश्न तेजस्वी यादव यांनी विचारला होता.

बिहारमधल्या सरकारी शाळांमध्ये ज्या शिक्षकांचं वय ५० वर्षांच्या वर गेलं आहे आणि ज्यांना चांगलं शिकवता येत नाही अशा शिक्षकांचे राजीनामे घेण्याचा निर्णय नितीशकुमार यांनी घेतला होता आता तेजस्वी यादव यांनी हाच निकष पुढे करत नितीशकुमारांनी संन्यास घ्यावा असं म्हटलं होते. पनामा पेपर्स प्रकरणात नितीश यांचा अंतरात्मा का जागा होत नाही, असादेखील प्रश्न त्यांनी विचारला होता.