बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पुरामुळे हाहाकार माजला आहे. पुराचं पाणी विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरू लागलं आहे, तर या महापुरामुळे बिहारमध्ये आत्तापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ५६ वर गेली आहे. तर सुमारे ७० लाख लोक पूरग्रस्त झाले आहेत. मंगळवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा राज्यातील पूरस्थितीची पाहणी केली. बिहारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिलेल्या माहितीनुसार १३ जिल्ह्यांमधील ९८ तालुके आणि १०७० गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे.

या महापुरामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही वाढ होते आहे. आत्तापर्यंत बिहारच्या अररिया जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत, राज्यातील ५६ मृत्यूंपैकी २१ मृत्यू हे एकट्या अररिया जिल्ह्यात झाले आहेत. तसंच सीतामढी, माधेपुरा, पूर्व चंपारण, दरभंगा आणि मधुबनी या ठिकाणीही पुरामुळे लोकांचे मृत्यू झाले आहेत. बिहारमध्ये पाऊस अजूनही सुरू आहे, तसंच नद्यांची पाणी पातळीही वाढतेच आहे असंही आपत्ती व्यवस्थापन विभागानं सांगितलं आहे.

आत्तापर्यंत ८५ हजार पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे, तसंच मदत आणि बचाव कार्यासाठी ३४३ छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. या सगळ्या पूरग्रस्तांसाठी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पुराच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफच्या पथकांकडून मदत केली जाते आहे. एसडीआरएफच्या पथकांनीही पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी मदत आणि बचाव कार्य सुरू केलं आहे.

बिहारमधील मुख्य नद्यांना उधाण आलं आहे, अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महानंदा आणि गंडक या दोन नद्यांमधूनही पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर केला जातो आहे, अशी माहितीही आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पुराचं पाणी रस्त्यांवरही आलं आहे. तर पुराचं पाणी रूळांवर साठल्यानं अनेक एक्स्प्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत अशी माहितीही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. पूरग्रस्त लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. तसंच पुरामुळे जे लोक बेघर झाले आहेत त्यांनाही मदत छावण्यांमध्ये हलविण्यात आलं आहे.

बिहारमध्ये उद्भवलेल्या या आस्मानी संकटाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केंद्राकडे मदत मागितली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बिहारला पुराच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वतोपरी मदत करू असं आश्वासन दिलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यासोबतही नितीशकुमार यांनी फोनवरून चर्चा केली आहे. बिहारसाठी केंद्रानं जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा असंही नितीशकुमार यांनी म्हटलं आहे.