News Flash

बिहारमध्ये नाराजीनाट्य रंगणार? सुशीलकुमार मोदींच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण

उपमुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार?

संग्रहित

मुख्यमंत्रीपदासाठी नितीश कुमार यांच्या नावाची निवड झाल्यानंतर बिहारमध्ये मुख्यमंत्री पदावरुन रंगलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र राज्यातील भाजपा नेतृत्वात बदल होत असल्याने राजकीय घडामोडींची शक्यता व्यक्त केली जात आहे. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी तारकिशोर प्रसाद सिंह यांची भाजपाचे विधिमंडळ नेते म्हणून निवड झाल्याचं जाहीर केलं असून उपमुख्यमंत्रीपदासाठीही त्यांचं नाव चर्चेत आहे. दुसरीकडे नितीश कुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचं नाव अद्याप निश्चित झालं नसल्याचं सांगितलं आहे.

या सर्व घडामोडींदरम्यान सुशीलकुमार मोदी यांनी केलेल्या ट्विटमुळे नव्या चर्चेला उधाण आलं आहे. माझ्याकडून कार्यकर्ता हे पद कोणी काढून घेऊ शकत नाही असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. “भाजपा तसंच संघ परिवाराने मला ४० वर्षाच्या राजकीय जीवनात इतकं दिलं आहे जे इतर कोणाला मिळालं नसेल. यापुढेही जी जबाबदारी दिली जाईल ती पार पाडेन. माझ्याकडून कार्यकर्ता हे पद कोणी काढून घेऊ शकत नाही,” असं सुशीलकुमार मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) नेतेपदी निवड जेडीयूचे नेते नितीश कुमार यांची निवड झाली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी नितीश कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी तयारीही सुरु झाली आहे. सोमवारी नितीश कुमार यांचा शपथविधी पार पडणार आहे.

बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांनी सरकार स्थापनेसाठी नितीश कुमार यांना निमंत्रण दिलं आहे. नितीश कुमार राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनात पोहोचले होते. भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, “माझी मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती. भाजापमधून कोणीतरी मुख्यमंत्री व्हावं असं मला वाटत होतं. पण भाजपाने केलेल्या आग्रखातर मी मुख्यमंत्री होत आहे”.

दरम्यान बिहारचे उपमुख्यमंत्री कोण होणार यावरील सस्पेन्स कायम आहे. नितीश कुमार यांना उपमुख्यमंत्रीदेखील उद्या शपथ घेणार का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “याची माहिती थोड्या वेळाने मिळेल. राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतला जाईल”. सोमवारी दुपारी ४.३० वाजता शपथविधी पार पडणार असल्याची माहिती नितीश कुमार यांनी दिली आहे. नितीश कुमार सातव्यांदा आणि सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2020 5:08 pm

Web Title: bihar former deputy cm sushilkumar modi tweet before oath ceremony sgy 87
Next Stories
1 “नितीश कुमारांना कंट्रोलमध्ये ठेवण्याचं रिमोट दुसऱ्या कुणाकडे तरी असणार”
2 काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आयसीयूत दाखल
3 चीनमध्ये आयात गोमांस, कोळंबीच्या पार्सलवर आढळले करोनाचे विषाणू
Just Now!
X