बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या आधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. आता पांडे विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बिहारमधील नितीश कुमार सरकारच्या वतीने राज्यपालांनी पांडे यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज स्वीकारला आहे. मागील काही दिवसांपासून पांडे हे अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणामुळे चांगलेच चर्चेत होते. याच पार्श्वभूमीवर त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेणे ही बिहारमधील मोठी राजकीय उलथापालथ मानली जात आहे.

पांडे स्वेच्छानिवृत्ती घेतील अशी चर्चा बिहारमध्ये मागील बऱ्याच काळापासून सुरु होती. मात्र आता पांडे बक्सर विधानसभेच्या जागेवरुन निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (रालोआ-एनडीए) पांडे यांना तिकीट मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पांडे यांनी २००९ सालीही लोकसभा निवडणूक लढण्यासाठी पोलीस दलाच्या सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. पांडे हे बिहारमधील १९८७ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सुशांत प्रकरणामध्ये अनेक वेळा थेट मुंबई पोलिसांच्या तपासावर पांडे यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केलं होतं. त्यांच्या वक्तव्यांमुळे ते चांगलेच चर्चेत होते.

यापुर्वीही घेतली होती स्वेच्छानिवृत्ती…

२००९ साली पांडे यांना बक्सर मतदारसंघामधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती. भाजपाकडून आपल्याला तिकीट मिळेल असं पांडे यांना वाटलं होतं. यामुळेच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. मात्र पांडे यांच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत. बक्सरचे  तत्कालीन भाजपा आमदार लालमुनी चौबे यांना पक्ष तिकीट नाकारेल आणि आपल्याला संधी देण्यात येईल असं पांडे यांना वाटलं होतं. चौबे यांनी आक्रमक भूमिका घेत तिकीट न मिळाल्यास भाजपा उमेदवाराच्या विरोधात उभं राहण्याची भूमिका घेतली. त्यानंतर पक्षाने चौबे यांना तिकीट दिलं आणि पांडे यांचे राजकारणात उतरण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं.

निवृत्ती घेतली तरी निवडणुकीचे तिकीट न मिळाल्याने निवडणुकीनंतर ९ महिन्यांनी पांडे यांनी बिहार सरकारकडे निवृत्ती मागे घेण्याची इच्छा असल्याचे पत्र लिहिले. राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या नितिश कुमार सरकारने पांडे यांची विनंती मान्य करत त्यांना पुन्हा सेवेत रुजू होण्यास परवानगी दिली.  २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआदी ते बिहारचे पोलीस महासंचालक झाले. पांडे यांनी भाजपाचे ज्येष्ठ दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना तत्कालीन नागरी हवाई उड्डाण मंत्री असणाऱ्या शहानवाज हुसैन यांच्यासाठी विशेष पोलीस अधिकारी म्हणूनही काम केलं आहे.

पांडेसंदर्भातील वाद

पाच वर्षांपूर्वी पांडे यांची सीबीआयकडून चौकशी झाली होती. मुज्जफरापूरमध्ये गाजलेल्या १२ वर्षीय मुलीच्या अपहरणच्या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या चौकशीसंदर्भात सीबीआयकडून पांडे यांची चौकशी झाली होती. नवरुना चक्रवर्ती या १२ वर्षीय मुलीचे तिच्या राहत्या घरातून अपहरण करण्यात आलं होतं. त्यावेळी पांडे हे मुज्जफरापूरचे आयजी होते. यावेळी मुलीच्या वडिलांनी मुलीचे अपहरण करण्याच्या कटामध्ये पांडे यांचा हात असल्याचा आरोप केला होता. आमची जमीन हडपण्यासाठी हे अपहरण करण्यात आलं असून या कटामध्ये पांडेंचाही समावेश असल्याचा आरोप मुलीच्या वडिलांना केला होता. मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये आरोपी म्हणून पांडे यांचे नावही होते. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआयचा तपास सुरु आहे. या प्रकरणाचे गूढ अद्याप उघड झालेले नाही.

पांडे यांचा प्रवास…

पांडे यांचा जन्म १९६१ साली बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील गेरुआबांध या गावी झाला आहे. त्यांनी पाटणा विद्यापिठामधून संस्कृतमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी युपीएससीची परीक्षाही संस्कृतमधूनच दिली. ते पहिल्या प्रयत्नामध्येच युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर ते आयकर अधिकारी झाले. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात ते आयपीएस परीक्षा उत्तीर्ण झाले. पांडे यांनी नक्षलग्रस्त औरंगाबाद, जेहानाबाद, अरवल, बेगुलसराय आणि नालंदासारख्या जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक म्हणून काम केलं आहे. पांडे यांनी पोलीस उपनिरीक्षक म्हणून मुंगेर आणि मुज्जफरापूर झोनमध्ये काम केलं आहे. त्यानंतर ते मुज्जफरापूरचे पोलीस निरीक्षक झाले आणि नंतर ते पोलीस दलाच्या प्रशिक्षण विभागाचे पोलिस महासंचालक झाले. वर्षभरापूर्वी त्यांची बिहारच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बिहारमध्ये दारुबंदीची अंमलबजावणी करण्यामध्ये पांडे यांचे मोलाचे योगदान आहे. २०१६ साली राज्यात दारुबंदीचा निर्णय घेतल्यानंतर पांडे यांनी राज्यभरात दौरा करुन दारुबंदीची अंमलबाजवणी नीट होत आहे की नाही याची पहाणी केली होती.