बिहारची राजधानी पाटण्यातून एक धक्कादायक बाब घटना समोर आली आहे. एका लग्नसमारंभात ९५ जणांना करोनाची बाधा झाली असून वराचा लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पाटण्यापासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या पालिगंज या ठिकाणी ही घटना घडली. १५ जून रोजी पार पडलेल्या एका लग्नसमारंभात ९५ जणआंना करोनाची बाधा झाली. त्यापैकी ८० जणांची करोनाच्या चाचणीचे अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आले.

मिळालेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय वर हा गुरूग्राममध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. तसंच आपल्या लग्नकार्यासाठी तो १२ मे रोजी आपल्या गावी पाटण्यात आला होता. याचदरम्यान, त्याला करोनाची लक्षणं दिसून आली. परंतु कुटुंबीयांनी त्याची चाचणी करण्याऐवजी त्याचं लग्न लावून दिलं. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी वराची प्रकृती बिघडली आणि त्याला पाटण्यातील एम्स रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, जिल्हा प्रशासनाला या घटनेची माहिती मिळताच त्याच्या लग्नसमारंभात सहभागी झालेल्या सर्वांची करोना चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर सुरूवातीला १५ जणांचे करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर उर्वरित ८० जणांचेही करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले.

दरम्यान, वधूचीही करोना चाचणी करण्यात आली. परंतु तिचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला. दरम्यान, या लग्नकार्यादरम्यान करोना संदर्भात घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचं जिल्हा प्रशासनाचं म्हणणं आहे. जिल्हा प्रशासनानं लग्नकार्यात ५० लोकांना सहभागी होण्याची परवानगी दिली होती. परंतु या लग्नकार्यात गावातील शेकडो लोक सहभागी झाले होते.

राजस्थानमध्ये लग्नकार्य पडलं महागात

यापूर्वी राजस्थानमधील भिलवाडा येथे लग्नसमारंभात २५० जणांना बोलावणं वर कुटुंबीयांना महागात पडलं होतं. या लग्नकार्यातही सहभागी झालेल्या मंडळींना करोनाची लागण झाली होती. तसंच या ठिकाणी करोनामुळे वराच्या आजोबांचा मृत्यू झाला होता. वर आणि त्याच्या वडिलांसह १५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. लग्नात सहभागी झालेल्यांपैकी १२७ जणांना क्वारंटाइनही करण्यात आलं होतं. तसंच यासाठी लागणारा सर्व खर्च वराच्या वडिलांना करण्यास सांगितलं होतं. यामध्ये आतापर्यंत त्यांनी ६ लाख २६ हजार ६०० रूपयांचा क्वारंटाइन सुविधांवर आणि उपचारांवर खर्च केला आहे.