बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे भीषण परिस्थिती असून उष्मघातामुळे आतापर्यंत १८४ जणांचा मृत्यू झाला आहे. पूर्वकाळजी म्हणून ३० जूनपर्यंत सरकारी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर गया येथील जिल्हाधिकाऱ्यांनी १४४ कलम लागू केलं आहे. सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान कोणतंही सरकारी अथवा खासगी बांधकाम, मनरेगा, सांस्कृतिक कार्यक्रम तसंच उघड्या ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

उष्मघातामुळे लोकांचे मृत्यू होत असल्याने परिस्थिती भीषण होत चालली आहे. आतापर्यंत उष्मघातामुळे १८४ जणांचा मृत्यू झाला असून १०० जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. फक्त गेल्या ४८ तासांत ११३ जणांना मृत घोषित करण्यात आलं आहे. सर्वात जास्त मृत्यू औरंगाबाद, गया आणि नवादा जिल्ह्यात झाले आहेत. याठिकाणी एकूण ६१ मृत्यू झाले आहेत.

औरंगाबादमध्ये सर्वात जास्त ३०, गया येथे २० आणि नवादा येथे ११ मृत्यू झाले आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे. लहान शाळकरी मुलांना उष्मघाताचा फटका बसू नये यासाठी बिहारमधील सर्व सरकारी शाळा ३० जूनपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मृतांमधील जास्त लोक ५० हून जास्त वयाचे आहेत. ताप आणि उलट्या होणं ही मुख्य लक्षणं आहेत.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी चार लाखांची मदत जाहीर केली आहे. यासोबतच नितीश कुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती पाऊलं उचलण्याचे आदेश दिले आहेत.

प्राथमिक आरोग्य विभागांना उष्मघाताच्या रुग्णांसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवण्याचा आदेश दिला आहे. परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत अधिकाऱ्यांना रुग्णालयात थांबण्यास सांगण्यात आलं आहे. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी गरज असेल तोपर्यंत, तापमान कमी होत नाही तोपर्यंत घरातून बाहेर पडू नका असं आवाहन केलं आहे.