बिहारच्या पाटणामधील ‘इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’ (आयजीआयएमएस) रुग्णालय प्रशासन वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. कर्मचाऱ्यांना ‘वैवाहिक जीवनाची माहिती’ या शीर्षकाखालील रकान्यात चक्क व्हर्जिन आहात की नाही याची माहिती द्यायला सांगितले आहे. सोशल मीडियावरदेखील हा अर्ज व्हायरल होत असून रुग्णालय प्रशासनावर टीकादेखील सुरु झाली आहे.

पाटणामध्ये ‘आयजीआयएमएस’ हे रुग्णालय आहे. दिल्लीतील एम्सच्या धर्तीवर बिहारमधील रुग्णांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी रुग्णालय सुरु करण्यात आले. रुग्णालय प्रशासनाने कर्मचाऱ्यांकडून वैवाहिक जीवनाविषयी माहिती मागवली होती. यासाठी कर्मचाऱ्यांच्या हातात एक अर्जही देण्यात आला. मात्र या अर्जामधील प्रश्न आणि त्यासाठी दिलेले पर्याय बघून कर्मचाऱ्यांना धक्काच बसला.

‘तुम्ही बॅचलर आहात की विधूर किंवा विधवा आहात की व्हर्जिन आहात’ असा प्रश्न यात विचारण्यात आला होता. हा पहिलाच प्रश्न बघून अनेक कर्मचाऱ्यांना संताप अनावर झाला होता. ‘आम्ही व्हर्जिन आहोत की नाही याचा आमच्या कामाशी काय संबंध?’ असा संतप्त सवाल रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी विचारला.

‘माझे लग्न झाले असून, माझी एकच जिवंत पत्नी आहे, माझे लग्न झाले असून, एका पेक्षा जास्त पत्नी आहे, माझे लग्न झाले असून, माझ्या पतीची दुसरी पत्नी नाही, माझे लग्न झाले असून, माझ्या पतीची एक पत्नी आहे’ असे पर्याय या अर्जात देण्यात आलेत. हा प्रकार बघून कर्मचारी नाराजी व्यक्त करत आहेत. अद्याप आयजीआयएमएसने या वृत्ताविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.