गेल्या रविवारी बिहारची राजधानी पाटणा येथून भारतीय लष्कराच्या एका जवानाने धावत्या कारमध्ये आपल्या पत्नी आणि मेव्हणीची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याचं वृत्त आलं होतं. या प्रकरणात आता नवा खुलासा झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, विष्णू शर्मा यांना संशय होता की सासरी गेले असतानाच त्यांना डास चावला होता आणि त्यामुळेच त्यांना डेंग्यूची लागण झाली होती. याबाबत त्यांनी कारमधून जाताना पत्नी आणि मेव्हणीशी चर्चा केली असता त्या दोघींनी असहमती दर्शवली आणि विरोध केला. परिणामी, विष्णू शर्मा यांना राग अनावर झाला आणि त्यांनी धावत्या कारमध्येच दोघींवर गोळ्या झाडल्या.

बिहार रेजिमेंटच्या बटालियन 7 चे जवान विष्णू शर्मा यांनी सासरी डास चावल्याची शिक्षा आपल्या पत्नी आणि मेव्हणीला गोळी घालून दिली. त्यानंतर स्वतःलाही संपवलं. एकाच कुटुंबातील तीन जणांच्या मृत्यूमुळे भोजपूरच्या लालगंज गावात शोककळा पसरली आहे. ‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, 22 नोव्हेंबर रोजी विष्णू शर्मा यांची मेव्हणी डिंपलचा विवाह होता. त्यासाठी ते सासरी गेले होते. या दरम्यान विष्णू शर्मा यांना डेंग्यूची लागण झाली, परिणामी त्यांची मानसिक स्थिती बिघडली. रविवारी त्यांना पाटण्याच्या एम्समध्ये उपचारासाठी नेलं जात असतानाच त्यांनी धावत्या कारमध्ये पत्नी,मेव्हणीवर गोळ्या झाडल्या. त्यावेळी त्यांचे चुलत सासरे मिथलेश ठाकूर गाडी चालवत होते. त्यांनी सांगितलं की, “सासरी डास चावल्यामुळे डेंग्यू झाल्याचं विष्णू यांनी म्हटल्यावर त्यांच्या पत्नी आणि मेव्हणीने त्याला नकार दिला. परिणामी संतापलेल्या विष्णू यांनी आपल्या परवाना असलेल्या पिस्तुलातून गोळी झाडली. पुढे बसलेल्या दोन्ही मुलांना गावकऱ्यांच्या मदतीने वाचवलं” असंही मिथलेश यांनी सांगितलं.

मिळालेल्या माहितीनुसार, विष्णू शर्मा हे शीघ्रकोपी होते. त्यामुळे अनेकदा त्यांना तुरूंगाची हवा देखील खावी लागली होती. पोलिस किंवा अन्य लोकांसोबत त्यांचं सातत्याने भांडण होत असायचं. उपचारासाठी पाटणा जातानाच विष्णू शर्मा यांनी मेव्हणी डिंपल आणि दमिनी यांची गोळी झाडून हत्या केली. त्यानंतर स्वतःचं जीवनही संपवलं.