विद्यापीठांमधील भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना मनस्तापाचा सामना करावा लागतो. यावरुन टीका होऊनही देशभरातील विद्यापीठांमधील गोंधळ काही थांबत नाही. बिहारच्या विद्यापीठामधील एका विद्यार्थ्याचे हॉलतिकीट हा सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे कॉर्मस शाखेतील हा विद्यार्थी चक्क गणपती बाप्पा आहे. विद्यापीठाने गणपती बाप्पाचा फोटो आणि स्वाक्षरी असलेले हॉलतिकीट एका विद्यार्थ्याला दिले आहे.

दरभंगा जिल्ह्यात ललित नारायण मिथिला विद्यापीठ असून या विद्यापीठातील कॉमर्स शाखेत शिकणाऱ्या कृष्ण कुमार रॉय या विद्यार्थ्याला परीक्षेचे हॉलतिकीट बघून धक्काच बसला. हॉलतिकीटावर चक्क गणपती बाप्पाचा फोटो होता. धक्कादायक बाब म्हणजे स्वाक्षरीही गणपतीच्या नावानेच होती. ‘हिंदूस्तान टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार हा प्रकार बघून कृष्णकुमार रॉय विद्यापीठात पोहोचला. विविध विभागांच्या फेऱ्या मारल्यावर शेवटी गणपती बाप्पाच्या फोटोच्या जागी कृष्णकुमारचा फोटो लावण्यात आला. गेल्या महिनाभरापासून मी महाविद्यालय आणि विद्यापीठात फेऱ्या मारत होतो, असे त्याने सांगितले.

विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकारासाठी सायबर कॅफे चालकाला जबाबदार धरले. विद्यापीठाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरला होता. विद्यार्थ्याने ज्या सायबर कॅफेतून अर्ज भरला तिथेच हा गोंधळ झाला असावा, असे विद्यापीठाचे रजिस्ट्रार मुस्तफा अन्सारी यांनी सांगितले.

आम्ही सर्व महाविद्यालयांना हॉलतिकीट विद्यापीठाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करण्याचे निर्देश दिले आहेत. हॉलतिकीटवरील सर्व माहिती तपासूनच प्राचार्यांनी त्यावर स्वाक्षरी करावी. अशा सूचनाही आम्ही दिल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. हॉलतिकीटवर गणपतीचे छायाचित्र असल्याची तक्रार आमच्याकडे आली होती, मात्र आम्ही या तक्रारीवर तोडगा काढला असून विद्यार्थ्याला परीक्षेला बसला येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र या गोंधळामुळे कृष्णकुमार रॉयचा अर्धा वेळ अभ्यासाऐवजी विद्यापीठ आणि महाविद्यालयात फेऱ्या मारण्यात गेला.