बिहारमधील अनेक जिल्ह्य़ांत काल रात्री झालेल्या वादळाने हजारो झोपडय़ा व उभी पिके जमीनदोस्त झाली. या वादळाच्या तडाख्याने ३२ लोक मरण पावले असून ८० गंभीर जखमी झाले आहेत. नॉरवेस्टर वादळाचा हा तडाखा होता.
बिहारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मुख्य सचिव व्यासजी यांनी सांगितले की, पुर्णिया जिल्ह्य़ात २५ जणांचा, तर मधेपुरात सहा जणांचा मृत्यू झाला. मधुबनी येथे एक जण मरण पावला. पुर्णिया, मधेपुरा, सहरसा, मधुबनी, समस्तीपूर, दरभंगा, येथे अनेक झाडे उन्मळून पडलय़ाने वीज पुरवठाही खंडित झाला. अनेक झोपडय़ा व मका, गहू व डाळीचे पीक जमीनदोस्त झाले.
जिल्ह्य़ातील रस्ते वाहतूक झाडे पडल्याने विस्कळीत झाली.भारतीय हवामान विभागाचे पाटणा येथील संचालक आर.के.गिरी यांनी सांगितले की, वादळी वाऱ्यांचा वेग ताशी ६५ कि.मी. होता. गिरी यांनी सांगितले, की हे वादळ नेपाळकडून आले व पुर्णिया, दरभंगा व भागलपूरला तडाखा दिला. आपली रडार माहिती वाऱ्याचा वेग ताशी ६५ कि.मी दाखवत होती. अशी वादळे कल बैसाखी व नॉरवेस्टर म्हणून ओळखली जातात. राज्य सरकारने मृतांच्या नातेवाइकांना चार लाख रु. प्रत्येकी भरपाई जाहीर केली आहे. आपत्ती निधीतून ही रक्कम दिली जाईल. व्यासजी यांनी सांगितले की, वादळाचा फटका बसलेल्या भागातील हानीचा प्रशासन आढावा घेत असून मुख्यमंत्री नितीशकुमार हे हवाई पाहणी करून नुकसानीचा अंदाज घेणार आहेत असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.