बिहारचे कॅबिनेट मंत्री राजीव रंजनसिंह यांनी माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यावर सोमवारी (दि.२८) हल्लाबोल केला. लालूंनी आतापर्यंत पूर पाहिलेला नाही. त्यांनी पूरग्रस्तांचे दु:ख कधी जाणून घेतले नाही. त्यांचं मानसिक संतुलन बिघडले आहे, अशा शब्दांत त्यांच्यावर टीका केली. पाटणा येथे पत्रकारांबरोबर ते बोलत होते. लालूप्रसाद यादव यांनी बिहारमध्ये जाणूनबुजून पूर आणल्याचा आरोप नितीश कुमार सरकारवर केला होता. त्याला राजीव रंजनसिंह यांनी प्रत्युत्तर दिले. लालूंचे मानसिक संतुलन बिघडल्यामुळे ते अशाप्रकारचे वक्तव्य करत असल्याचे ते म्हणाले.

लालूंनी बिहारमध्ये पूर आला नसून तो जाणूनबुजून आणण्यात आला आहे. धरणे, बांध तोडल्यामुळे नदीचे पाणी गावांत घुसले आहे. यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप त्यांनी सरकारवर केला होता. मदतीच्या नावाने कोट्यवधी रूपये घ्यायचे आणि नंतर ते वाटून घ्यायचे अशी त्यांची योजना असून ते लोकांना मुर्ख बनवत असल्याचे लालूंनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा राजीव रंजन यांनी समाचार घेतला. लालूंनी बिहारमधील पूर कधी गंभीरपणे घेतलाच नसल्याचे त्यांनी म्हटले.

लालूंनी काही वर्षांपूर्वी पुरामुळे बिहारमध्ये मोठी जीवित व वित्तहानी झाल्यानंतरही पूर चांगला असल्याचे म्हटले होते. त्याचा समाचार घेताना मंत्री लल्लन सिंह यांनीही लालूंचा मेंदू काम करणे बंद झाल्यामुळेच ते काहीबाही बोलत असल्याचे म्हटले होते. लालूंना फक्त त्यांच्या कुटुंबीयांची चिंता आहे. पुराची नाही. त्यांनी कधी पूर पाहिलाच नाही, त्यांच्या वेदना समजून घेतल्याच नाहीत. त्यामुळे त्यांना कसं समजणार की, पूर कसा येतो ?