बिहारमधील नितीश कुमार यांच्या सरकारमधील मंत्री राम सूरत राय यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारं वक्तव्य केलं आहे. बिहारमधील महसूल व जमीन सुधारणा मंत्री राम सूरत राय यांनी बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो असं म्हटलं आहे. त्याचवेळी त्यांनी त्यांच्या स्वत:च्या मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या विभागांमध्येही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचाही उल्लेख केला. माझ्या विभागातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. नितीश यांच्या मंत्रीमंडळामध्ये भाजपाच्या कोट्यातून मंत्री झालेल्या राम सूरत राय यांनी स्वत:च्या विभागाचा उल्लेख करताना इथेही चुकीच्या पद्धतीने व्यवहार होतात असं म्हटलं आहे. मुज्जफरपूरमधील एका सत्कार सोहळ्याच्या वेळी राय यांनी हे वक्तव्य केल्याचं ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

राम सूरत राय यांच्या या वक्तव्यावरुन आता राजकारण सुरु झालं आहे. राम सूरत राय यांच्या वक्तव्यावर जनता दल युनायटेडने आक्षेप नोंदवल आहे. जदयूचे आमदार खालिद अनवर यांनी राम सूरत राय आता मंत्री झाले आहेत. त्यांना अंदाज नसेल पण नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराला थारा दिला जात नाही. बिहार हे असं पहिलं राज्य आहे जिथे भ्रष्टाचारप्रकरणी अगदी मोठ्या अधिकाऱ्यांवरही सरकारन ेकारवाई केली आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये नितीश कुमार हे थेट कारवाई करतात, असं अनवर यांनी म्हटलं आहे.

सत्ताधारी पक्षातील मंत्र्यानेच असं वक्तव्य केल्याने काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने चौकशीची मागणी केली आहे. सध्या मंत्री असणाऱ्या नेत्याने आपल्या विभागात भ्रष्टाचार होत असल्याचं म्हटलं असेल तर यापूर्वी मंत्री होऊन गेलेल्यांचीही चौकशी झाली पाहिजे असं विरोधी पक्षांनी म्हटलं आहे. राजदचे नेते भाई वीरेंद्र यांनी मंत्री मोहोदयांनी सत्यावर प्रकाश टाकला असल्याचं मत व्यक्त केलं आहे. हे सत्य असून सरकारने याची दखल घेतली पाहिजे. ही गोष्ट सर्वसामान्यांपैकी कोणी सांगितली असती तर जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला नसता. मात्र स्वत: मंत्रीच आता ही गोष्ट सांगत आहेत, असं भाई वीरेंद्र म्हणाले आहेत.

विरोधी पक्षांनी नितीश कुमार यांची सरकार भ्रष्टाचारामध्ये अखंड बुडालेली असल्याचा आरोप केला आहे. सर्वच विभागांमध्ये भ्रष्टाचार आणि पैसे दिल्याशिवाय काम होत नाही हे आम्ही खूप आधीपासून सांगत आहोत, असंही विरोधी पक्षांनी म्हटलं आहे.