बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणूक सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे, तर उर्वरित दोन टप्प्यांसाठी मतदान बाकी आहे. मात्र, एकीकडे प्रचाराचा धुरळा उडत असतानाच बिहारमधील मुंगेरमध्ये सध्या चर्चेचा प्रमुख मुद्दा ठरलं आहे. मुंगेरमधील परिस्थितीची चक्क केंद्रीय निवडणूक आयोगाला दखल घ्यावी लागली. मुंगेरमध्ये सलग दुसऱ्यांदा हिंसेचा भडका उडाला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत मुंगेरच्या जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

मुंगेरमध्ये गुरूवारी पुन्हा एकदा हिंसाचारानं टोक गाठलं. याचं मूळ कारण आहे दूर्गा मूर्ती विसर्जनावेळी झालेला वाद. राज्यात निवडणूका असल्यानं जिल्हा प्रशासनानं दुर्गा मूर्ती विसर्जनासाठी २६ ऑक्टोबरपर्यंतचं वेळ दिली होती. मुंगेरमधील पंडित दीन दयाल चौकाजवळील शंकरपूरमध्ये याच काळात पोलीस आणि स्थानिकांमध्ये वाद झाला. याच वादातून मध्यरात्री गोळीबार करण्यात झाला. यात एका १८ वर्षाच्या युवकाचा मृत्यू झाला होता. तर इतर काही लोक जखमी झाले होते.

या घटनेवर पोलीस प्रशासनानं असं म्हटलं होतं की, मूर्ती विसर्जनावेळी काही समाजकंटकांनी धिंगाणा घातला. त्यातच पोलिसांवर गोळीबारही करण्यात आला. यात अनेक पोलीसही जखमी झाले, तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. याच घटनेनंतर मुंगेरमध्ये परिस्थिती तणावपूर्ण होत गेली आणि पोलिसांविरुद्ध स्थानिक नागरिकांचा रोष वाढत गेला. हा मुद्दा बिहारमध्ये महत्त्वाचा बनला आहे.

गुरूवारी काय झालं?

मूर्ती विसर्जनावेळी झालेल्या कारवाईचा निषेध करत अनेक तरूण रस्त्यावर उतरले. हे तरुण पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात गेले. तिथे प्रचंड गदारोळ केला. त्यानंतर तरुणांच्या जमावानं पूरब सराय ठाण्यावर हल्ला केला. कार्यालयाची प्रचंड तोडफोड करत जाळपोळ केली. यात पोलिसांची एक गाडीही जाळण्यात आली.

निवडणूक आयोगाकडून मोठी कारवाई

मुंगेरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यानंतर निवडणूक आयोगानं तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले. आयोगानं मुंगेरचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची बदली करण्याचे आदेश दिले. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मगधच्या विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यानंतर तातडीनं जिल्हाधिकारी व पोली अधीक्षकांची बदली करण्यात आली असून, जिल्हाधिकारी पदी रचना पाटील, तर मानवजीत सिंह ढिल्लो यांच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.