मुख्यमंत्रीपदासाठी नितीश कुमार यांच्या नावाची निवड झाल्यानंतर बिहारमध्ये मुख्यमंत्री पदावरुन रंगलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. तर, राज्यातील भाजपा नेतृत्वात बदल होत असल्याने मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची चिन्ह दिसत आहेत. माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार यांना केंद्रीय कॅबिनेटमध्ये स्थान दिलं जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. यावरून काहीसे भावूक झालेल्या सुशीलकुमार मोदी यांनी केलेल्या ट्विटमुळे नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांनी ट्विट करून सुशीलकुमार मोदींना सल्ला दिला आहे. “आदरणीय सुशीलकुमार मोदी आपण नेता आहात. उपमुख्यमंत्रीपद तुमच्याकडे होतं. पुढे देखील तुम्ही भाजपाचे नेता राहाल. पदामुळे कोणी लहान-मोठं होत नाही.” असं त्यांनी म्हटलं आहे.

“भाजपा तसंच संघ परिवाराने मला ४० वर्षाच्या राजकीय जीवनात इतकं दिलं आहे जे इतर कोणाला मिळालं नसेल. यापुढेही जी जबाबदारी दिली जाईल ती पार पाडेन. माझ्याकडून कार्यकर्ता हे पद कोणी काढून घेऊ शकत नाही,” असं सुशीलकुमार मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तर दुसरीकडे भाजपाचे तारकिशोर प्रसाद सिंह व रेणुदेवी यांची नावं उपमुख्यमंत्री पदासाठी शर्यतीत असल्याचे समोर येत आहे.