राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या निवासस्थानी काल, मंगळवारी छापे टाकण्यात आले होते. या कारवाईच्या विरोधात राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. बुधवारी पाटणातील राजदच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयावर धडक दिली. भाजप नेते सुशील मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतर भाजप आणि राजदचे कार्यकर्ते परस्परांशी भिडले. आंदोलनादरम्यान राजद कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयावर दगडफेक केली, तसेच तेथील वाहनांची तोडफोड केली.

बेनामी संपत्तीप्रकरणी राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित मालमत्तांवर आयकर विभागाने काल छापेमारी केली. या कारवाईच्या विरोधात लालूप्रसाद यादव समर्थकांनी संताप व्यक्त केला. त्यांनी भाजपच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. भाजपचे नेते सुशील मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याचदरम्यान प्रचंड गदारोळ झाला. भाजप आणि राजद कार्यकर्त्यांनी परस्परांवर दगडफेक केली. या आंदोलनात जवळपास १०० कार्यकर्ते सहभागी झाले होते. राजदच्या आंदोलनानंतर भाजपचे नेते मंगल पांडे यांनी तोफ डागली आहे. लालूप्रसाद यादव यांच्याविरोधात भ्रष्टाचारप्रकरणी कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईमुळे राजदचे कार्यकर्ते हताश झाले आहेत. नैराश्येतून राजद कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

आयकर विभागाने काल १००० कोटींच्या बेनामी संपत्ती प्रकरणात लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित २२ ठिकाणांवर छापेमारी केली होती. भाजपचे नेते सुशील मोदी यांनी लालूप्रसाद यादव यांचे बेनामी संपत्ती प्रकरण चव्हाट्यावर आणले होते. त्यानंतर आयकर विभागाने ही छापेमारी केली. ही कारवाई राजकीय सूड भावनेतून केली आहे, असा आरोप राजदने केला होता.