सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी व्यवस्थापक पिठानी याचा शोध 

पाटणा पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखालील पथक दाखल

पाटणा : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बिहार  पोलीस चौकशी करीत असून सुशांतच्या  मुंबईतील सदनिकेत त्याच्याबरोबर राहणाऱ्या सिद्धार्थ पिठानी याचा जबाब ते नोंदविणार आहेत. त्यासाठी पिठानी याचा शोध सुरू आहे.

सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी मुंबईतील बांद्रा येथील एका अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली होती. तो मृतावस्थेत सापडल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले होते. पिठानी हा त्याचा  व्यवस्थापक होता. तो त्याच्या सदनिकेतच राहत होता. बिहार पोलीस त्याचा शोध घेत असून त्याच्याशी संपर्काचे प्रयत्न अजून यशस्वी झालेले नाहीत. तो अजून पोलिसांना सामोरा आलेला नाही. तो हजर झाला नाही तर त्याला नोटीस पाठवली जाईल, असे पाटण्याचे पोलीस  महानिरीक्षक संजय सिंह यांनी सांगितले. पिठानी याने मुंबई पोलिसांना दोन दिवसांपूर्वी पाठवलेल्या इमेल संदेशात  म्हटले होते, की राजपूत कुटुंबीयांनी सुशांतची मैत्रीण रिया चक्रबर्ती हिच्या विरोधात निवेदन देण्यासाठी त्याच्यावर दबाव आणला होता.

पिठानी याने असे म्हटले होते, की सुशांतशी आपले व्यावसायिक संबंध होते.

संजय सिंह यांनी म्हटले आहे, की  विनय तिवारी हे पाटण्याचे पोलीस अधीक्षक आहेत. ते मुंबईला गेले असून ते बिहारच्या विशेष चौकशी पथकाचे नेतृत्व करीत आहेत.

बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी शनिवारी सांगितले, की वेळ पडली तर वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यास चौकशीसाठी मुंबईला पाठवले जाईल. पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार बिहार पोलिसांचे पथक रिया चक्रबर्तीला शोधण्यात अपयशी ठरले आहे. रिया चक्रबर्ती हिनेच सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केले असा सुशांतच्या वडिलांचा आरोप आहे.  त्यांनी असे म्हटले होते, की तिनेच त्याला बेकायदा डांबून ठेवले होते. त्याच्या एका बँक खात्यातून तिने १५ कोटी रुपये काढून घेतले. त्याच्या मानसिक आजारावर उपचार तिने कुटुंबीयांना न विचारता सुरू केले, असा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे.

बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी सांगितले, की बिहारच्या पोलीस पथकास मुंबई पोलिसांकडून कागदपत्रे मिळालेली नाहीत. सुशांतच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आम्ही प्राथमिक माहिती अहवाल नोंदवला असून त्याच्याशिवाय आमच्याकडे काही नाही. शवविच्छेदन अहवाल, व्हिडिओ चित्रण सगळे मुंबई पोलिसांकडे आहे. मुंबई व बिहार पोलीस यांनी मिळून सत्य बाहेर काढावे. सुशांतचा मृत्यू ही साधी सरळ घटना नाही.

बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांचे मुंबई पोलीस, मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर आरोप

बिहार पोलिसांचे चार सदस्यांचे पथक आधीच मुंबईत आले असून सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी त्याच्या मृत्यूबाबत २५ जुलैला पाटणा येथे पोलिस तक्रार केली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर एक महिन्याने त्यांनी ही तक्रार दाखल केली होती. मुंबई पोलिसही या प्रकरणी तपास करीत असून बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी असा आरोप केला, की पाटणा पोलिसांना मुंबई पोलीस चौकशीत सहकार्य करीत नाहीत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या निधीवर चालणाऱ्या बॉलिवूड माफियांच्या दबावाखाली आहेत. त्यामुळे या प्रकरणी जबाबदार असणाऱ्यांना ते पाठीशी घालत आहेत. मुंबई पोलीस हे बिहार पोलीस  करीत असलेल्या चौकशीत अडथळे आणीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.