बिहार विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान २८ ऑक्टोबर रोजी होत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा चांगल्याच तापल्या आहेत. प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोप होत असून, उद्यापासून लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान प्रसारात सहभागी होणार आहेत. प्रचाराला सुरूवात करण्यापूर्वी आपला निर्धार बोलून दाखवला.

बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. करोना असला तरी सभांना प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. तर दुसरीकडे महाआघाडी विरुद्ध एनडीए यांच्या आरोपांच्या चकमकी झडत आहेत. ऐन प्रचाराच्या सुरूवातीलाच लोक जनशक्ती पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन झालं. अचानक कोसळेल्या दुःखामुळे लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान प्रचारापासून दूर होते.

रामविलास पासवान यांच्या मृत्यूनंतर सर्व विधी पार पडल्यानंतर उद्यापासून चिराग पासवान प्रचारात उडी घेणार आहेत. प्रचारात उतरण्यापूर्वी चिराग पासवान म्हणाले,”लोक जनशक्ती पार्टी जेडीयूपेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवत आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त जागा जिंकू,” असा विश्वास चिराग पासवान यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना ते म्हणाले,”आता मी रामविलास पासवान यांच्या मृत्यूनंतर करायवयाच्या सर्व धार्मिक कार्यक्रमातून मोकळा झालो आहे. त्यामुळे सध्याचे मुख्यमंत्री (नितीश कुमार) पुन्हा कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत, या संकल्पासह मी उद्यापासून लोकांमध्ये असेल,” असा निर्धार चिराग पासवान यांनी व्यक्त केला.

चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात दंड थोपटले असले, तरी रामविलास पासवान यांच्या श्राद्धच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी चिराग पासवान यांचं सांत्वन केलं. पाटणा येथील लोक जनशक्ती पार्टीच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला.