दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करूनही झालेल्या अत्यंत दारुण पराभवामुळे या निर्णयाची पुनरावृत्ती न करण्याचा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र, झारखंड व हरयाणाप्रमाणेच बिहारचा सामना जनता परिवाराचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीशकुमार विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी असाच रंगणार आहे. बिहारमध्ये निवडणुकीपूर्वी भाजप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करणार नसल्याचे केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांनी पाटणा येथे स्पष्ट केले. गेल्या वर्षभराच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासकामांवरच आम्ही बिहारमध्ये मते मागू, असे अनंतकुमार म्हणाले.
जनता परिवार एकसंध झाल्यामुळे भाजपचे धाबे दणाणले आहेत. माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी हे भाजपच्या गोटात दाखल झाले असले तरी अद्याप दलित मतांवर भाजपने हक्क सांगितलेला नाही. राष्ट्रीय लोकदलाचे सर्वोच्च नेते व केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनीदेखील भाजप ठरवेल तोच मुख्यमंत्री असेल, असे स्पष्ट केले होते. नितीशकुमार यांच्याविरोधात स्थानिक नेत्यास मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केल्यास दिल्लीसारखी अवस्था होण्याची भीती भाजप नेत्यांना आहे. त्यामुळे हा सामना थेट नितीशकुमार विरुद्ध मोदी असा होऊ देण्याची रणनीती भाजपने आखली आहे.