बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरुद्ध डीएनएबाबतचे वक्तव्य निवडणुकीत आपल्यावरच बुमरँग होण्याची शक्यता निर्माण झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. बिहारची जनता अत्यंत हुशार असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.
दोन महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या रक्तात खोट असल्याचे वक्तव्य केल्याने मोठी नाराजी ओढवून घेतली होती. नितीशकुमार आणि राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमवेत एकाच व्यासपीठावर येऊन लोकनायक जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर लोहिया यासारख्या नेत्यांच्या वारशाचा बळी दिला आहे, असा आरोपही मोदी यांनी केला. निवडणुकीपूर्वीच्या अखेरच्या परिवर्तन मेळाव्यात मोदी पुढे म्हणाले की, जद(यू) आणि राजद राज्यात जातीयतेचे विष पसरवत आहेत. नव्याने स्थापन झालेल्या महाआघाडीच्या स्वाभिमान मेळाव्याला परिवर्तन मेळाव्याने प्रत्युत्तर देण्याचा भाजपने प्रयत्न सुरू केला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्याच्या निवडणुकीत आपण प्रथमच विकासावर भर दिला असल्याचा दावा मोदी यांनी केला आहे. जवळपास २५ वर्षांनंतर जनतेने विकासाला साथ देण्याचे ठरविले आहे, त्यामुळे कितीही पक्ष आमच्याविरोधात एकत्र आले तरी एनडीएचा विजय रोखू शकत नाहीत, असेही पंतप्रधान म्हणाले. डीएनए वक्तव्य आपल्यावर उलटू शकते याची जाणीव झाल्याने मोदी यांनी, बिहारमधील जनता अत्यंत समंजस आणि हुशार असल्याचे नमूद केले. पंतप्रधानांनी बिहार जनतेचा अपमान केल्यावरून मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सुमारे दोन महिने प्रचारसभांमधून जोरदार टीका सुरू केली होती.
मोदींचे वक्तव्य उथळ
पाटणा : देशातील सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) आणि सेन्सेक्समध्ये घसरण झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी अस्वस्थ झाले असून त्यापोटीच ते पॅकेजबाबत वक्तव्य करीत असल्याची टीका बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी येथे केली. वित्त आयोगामार्फत राज्यांना देण्यात येणारा निधी केंद्र सरकार थांबवू शकते का, हा निधी राज्यांच्या अंतर्गत स्रोतांमधून मिळतो, देशाचा पंतप्रधान अशा प्रकारचे उथळ वक्तव्य करू शकतो का, असे सवाल नितीशकुमार यांनी उपस्थित केले आहेत.