दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या भावावर गोळीबार करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. बिहारमधील सहरसा येथे ३० जानेवारी रोजी सुशांतचा मामेभाऊ आणि मधेपुरा येथील यामाहा मोटरसायकलच्या शोरुमचे मालक असणाऱ्या राजकुमार सिंह यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये राजकुमार सिंह यांच्यासहीत त्यांचा एक कर्मचारीही जखमी झाला होता. बैजनाथपूर चौकाजवळ मोटरसायकलवरुन आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी या आरोपींचा शोध सुरु केला होता.

सहरसाच्या पोलीस अधीक्षक लिपी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना जमीनीसंदर्भातील वादातून घडली आहे. राजकुमार सिंह यांची हत्या करण्याची सुपारी देण्यात आली होती. हा व्यवहार पाच लाखांमध्ये ठरवण्यात आलेला. राजकुमार सिंह यांचा छोटा भाऊ आणि शहरातील प्रसिद्ध व्यापारी उमेश दालान यांच्यादरम्यान मागील बऱ्याच काळापासून वाद सुरु होता. उमेश दालान यांनी विक्की चौबे नावाच्या आरोपीला राजकुमार यांची हत्या करण्यासाठी पैसे दिले होते. मात्र आरोपींच्या हल्ल्यामध्ये राजकुमार सुदैवाने बचावले आणि त्यांना केवळ किरकोळ जखम झाल्याचे एबीपीने दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

३० जानेवारी रोजी आरोपींनी राजकुमार आणि त्यांच्या एका कर्मचाऱ्यावर हल्ला केला. आरोपींनी दिवसाढवळ्या एका चौकाजवळ राजकुमार आणि त्यांच्या कार्मचाऱ्यावर गोळीबार केला. या घटनेसंदर्भात माहिती मिळताच प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी विशेष तपास गटाची स्थापना करत चौकशीला सुरुवात केली. तपासादरम्यान पोलिसांना सीटीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींबद्दलचे काही पुरावे मिळाले. या आरोपींच्या फोन लोकेशनच्या आधारे त्यांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आला. पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला असता या ठिकाणी बिंदेश्वरी यादव नावाच्या कुख्यात गुंडासहीत पाच इतर आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. अटक करण्यात आलेले सर्वजण गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे आहेत. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे.