बिहारमध्ये दरवर्षी दहावी आणि बारावीच्या परिक्षेमध्ये मोठ्याप्रमाणात कॉपी करण्याची प्रकरणे समोर येतात. म्हणूनच यंदा बिहार बोर्डाने नक्कलबहादुरांना लगाम घालण्यासाठी नवीन नियम अंमलात आणले आहे. बिहार शालेय परिक्षा बोर्डाने (बीएसईबी) जाहीर केलेल्या नवीन नियमावलीनुसार यंदा विद्यार्थ्यांना परिक्षा हॉलमध्ये प्रवेश मिळणार आहे. या नवीन नियमांनुसार परिक्षा हॉलमध्ये सॉक्स आणि बूट घालून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळेच कालपासून सुरु झालेल्या परिक्षांसाठी बोर्डाच्या परिक्षेला बसलेले १७ लाखाहूंन अधिक विद्यार्थी चप्पल घालून हजर झाले.

बोर्डाची नवीन नियमावली जाहीर झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी १७ लाख ७० हजार विद्यार्थ्यांनी १ हजार ४२६ केंद्रांवर परिक्षेचा पहिला पेपर दिला. ही परिक्षा २८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यामुळे परिक्षा संपेपर्यंत या १७ लाख विद्यार्थ्यांना चप्पल घालूनच परिक्षेला येणे बंधनकारक असणार आहे. बीएसईबीचे अध्यक्ष आनंद किशोर यांनी हे नियम नवीन नसल्याचे सांगितले आहे. राज्यात होणाऱ्या इतर स्पर्धा परिक्षांमध्ये अशाच प्रकारचे नियम असतात. हेच स्पर्धा परिक्षांचे नियम आम्ही बोर्डाच्या परिक्षांसाठी अंमलात आणण्याचे ठरवल्याची माहिती किशोर यांनी दिली. या नवीन नियमांमुळे यंदाच्या वर्षी बोर्डाची परिक्षा नक्कल न करता आणि अधिक पारदर्शक पद्धतीने पार पडेल अशी अपेक्षा बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. १२ तारखेपासून सुरु झालेल्या बारावीच्या परिक्षेदरम्यान नक्कल करणाऱ्या हजारहून अधिक विद्यार्थ्यांना दंड करण्यात आला आहे.