मुझफ्फरपूर अत्याचार प्रकरणी आरोपीचा दावा

मुझफ्फरपूर : बिहारमधील मुझफ्फरपूर येथील बालिकागृहात मुलींवर अत्याचार करण्यात आल्याच्या प्रकरणातील प्रमुख आरोपी ब्रजेश ठाकूर याने समाजकल्याण मंत्री मंजू वर्मा यांच्याशी संबंधाचे आरोप फेटाळले असून राजकीय कटातून या प्रकरणात गोवण्यात आल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात मात्र ठाकूर आणि मंजू वर्मा यांच्या पतीचे किमान सतरा वेळा फोनवर बोलणे झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

न्यायालयाबाहेर ठाकूर याने वार्ताहरांना सांगितले की, ‘‘मला राजकीय बळीचा बकरा करण्यात आले आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट मिळणार असल्याने या प्रकरणात मुद्दाम गोवण्यात आले आहे.’’

ठाकूर याने दावा केला, की मला २०२० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी मिळणार होती. काँग्रेसने मात्र त्याचा हा दावा फेटाळला असून काँग्रेस आमदार प्रेमचंद मिश्रा यांनी सांगितले, की ठाकूर हा काँग्रेसचा प्राथमिक सदस्यही नाही.

ठाकूर याला बुधवारी इतर नऊ आरोपींसह न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा जन अधिकार पक्षाच्या समर्थकांनी ठाकूर याला आत नेताना काळे फासले. या पक्षाचे मधेपुराचे खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी मुझफ्फरपूर प्रकरण संसदेत लावून धरले आहे.

समाज कल्याण मंत्री मंजू वर्मा यांचे पती चंदेश्वर वर्मा यांना वारंवार दूरध्वनी केल्याबाबत विचारले असता ठाकूर याने सांगितले, की राजकीय मुद्दय़ांवर मी  त्यांच्याशी बोलत असे. मंजू वर्मा आणि त्यांच्या पतीशी माझे औपचारिक संबंध होते. ठाकूर याची हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषेत वृत्तपत्रे आहेत. ठाकूरच्या स्वयंसेवी संस्थेच्या बालिकागृहात ३५ मुलींवर बलात्कार झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. ठाकूर याने बिहार पीपल्स पार्टीकडून निवडणूक लढवली होती.

मंजू वर्मा यांचा राजीनामा

दरम्यान, बिहारच्या समाजकल्याण मंत्री मंजू वर्मा यांनी या प्रकरणात पतीचे नाव आल्याने राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक होते. या प्रकरणी वर्मा यांचा दूरान्वयानेही संबंध दिसून आल्यास त्यांचा राजीनामा घेऊ, असे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्पष्ट केले होते.