बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून यामध्ये बिहारच्या जनतेला मोफत करोनाची लस देण्याचे आश्वासन दिले. यावरुन शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे. बिहारला लस मिळवाी यात दुमत नाही, पण इतर राज्ये पाकिस्तानात नाहीत, अशा शब्दांत शिवसेनेने भाजपाला टोला लगावला आहे.

सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर टीका करण्यात आली आहे. शिवसेनेनं म्हटलं की, “स्वातंत्र्यपूर्व काळात “तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा” हा नारा होता. तो भारतमातेचा आक्रोश होता. पण आता “तुम मुझे वोट दो, मै तुम्हे लस दुंगा” असा प्रकार सुरु झाला आहे. भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यांनी मग रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांच्याकडून करोनाची लस मागवायची का? असा सवालही शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

कोविड-१९ लशीचे वितरणामध्ये सरकारचा राष्ट्रीय दृष्टीकोन हवा. १३० कोटी जनतेच्या लसीकरणासाठी सरकारला कमीत कमी ७०,००० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. बिहार हा देशातील एक भाग आहे. या राज्याने केंद्राकडे सातत्याने विशेष राज्याच्या दर्जाची मागणी केली आहे. नितिशकुमार या राज्याचे मुख्यमंत्री असतानाही हे राज्य कायमच मागास राहिलं आहे. त्यामुळे बिहारला लस मिळायला हवी यात शंका नाही पण इतर राज्ये ही पाकिस्तानात नाहीत. कोविडच्या लसीचा मुद्दा हा बिहारच्या निवडणूक जाहीरनाम्यात व्हायला नको होता, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

करोनाच्या लसीबाबत भाजपाचं धोरण नक्की काय आहे? त्यांचा मार्गदर्शक कोण आहे? पंतप्रधानांनी कधीही लसीच्या वितरणाबाबत बोलताना जात, धर्म, प्रांत, राजकारण याचा उल्लेख केला नाही. मात्र, आता भाजपाच्या नेत्यांनी बिहारच्या निवडणुक प्रचारासाठी आश्चर्यकारण भूमिका घेतली आहे, अशा शब्दांत शिवसेनेने भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

या निवडणुकीच्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक सभा घेतल्या जात आहेत. मोठ्या प्रमाणावर लोक सभांना गर्दी करत आहेत. मात्र, नेते मंडळी हेलिकॉप्टरमधून येत आणि जात आहेत. यामध्ये फिजिकल डिस्टंसिंगचे नियम धाब्यावर बसवले आहेत, असं निरिक्षणही शिवसेनेनं आपल्या अग्रलेखातून मांडलं आहे.