बिहारमध्ये शनिवारी जनता दल संयुक्तच्या नेत्याच्या एसयूव्ही गाडीला मागे टाकण्याचा प्रयत्न केला असता एका एकोणीस वर्षांच्या मुलाला गोळ्या घालून ठार मारण्यात आले. दरम्यान भाजपने या प्रकरणी आंदोलन सुरू केले आहे. आदित्य सचदेव असे या मरण पावलेल्या मुलाचे नाव असून तो स्वीफ्ट मोटारीत मित्रांसमवेत होता व त्याने जनता दल संयुक्तच्या नेत्या मनोरमा देवी यांच्या कुटुंबीयांच्या रेंज रोव्हर गाडीला मागे टाकण्याचा प्रयत्न केला असता स्वीफ्ट मोटारीतील सचदेव याला गोळ्या घालून ठार करण्यात आले.
रेंज रोव्हर गाडीत मनोरमा देवी यांचा मुलगा रॉकी होता, असे बिहार पोलिसांनी सांगितले. आदित्यचा जो मित्र मोटारीत होता त्याने पोलिसांना सांगितले, की त्यांच्या गाडीने एसयूव्ही वाहनाला मागे टाकले, तेव्हा रॉकी व त्याच्या अंगरक्षकांनी गोळीबार केला. त्यांनी आम्हाला गाडीतून उतरायला लावले व नंतर गुद्दे लगावले, आम्ही पळ काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यापकी कुणीतरी पुन्हा गोळी मारली ती आदित्यला लागली. सुरक्षा रक्षकांशिवाय गाडीच्या पुढच्या आसनावर बसलेल्या व्यक्तीकडेही बंदूक होती. आदित्य व त्याच्या मित्रांनी बारावीची परीक्षा दिली होती.मनोरमा देवी या बिहार विधानपरिषदेच्या आमदार असून त्यांचा मुलगा रॉकी अद्याप फरार आहे. पोलिसांनी मनोरमा देवी यांचा पती िबदेश्वरी प्रसाद यादव ऊर्फ िबदी यादव तसेच त्यांच्या रक्षकाला अटक केली आहे. गाडीतील रक्षकाने सांगितले, की आदित्यला जी गोळी लागली ती त्याने मारली नव्हती तर रॉकीच्या रिव्हॉल्व्हरमधून झाडलेली होती. यादव यांनी असा आरोप केला, की त्यांच्या मुलाला आदित्य व त्याच्या मित्रांनी मारहाण केली होती व ते दारू प्यालेले होते. रॉकीकडे परवाना असलेली रिव्हॉल्व्हर होती, असे मात्र त्यांनी कबूल केले आहे. यादव यापूर्वी देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत होते. २०११ मध्ये त्यांच्याकडून शस्त्रे व सहा हजार गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या. जनता दल संयुक्तचे के.सी.त्यागी यांनी सांगितले, की जर कुणी चुकीचे काही केले असेल, तर त्यांची गय केली जाणार नाही.