बिहार निवडणुकीपूर्वी राज्यातील महिलांना दिलेल्या आश्वासनाची पूर्ती मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली आहे. १ एप्रिल २०१६ पासून राज्यात मद्यावर बंदी घालण्याची घोषणा गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी केली.
आपले सरकार सत्तेवर आल्यास मद्यावर बंदी घालण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करण्यास सरकार बांधील आहे, असे नितीशकुमार यांनी अबकारी दिन कार्यक्रमात जाहीर केले.
मद्याच्या विक्रीतून राज्याला दर वर्षी ४०० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र महिला आणि गरिबांच्या हितासाठी राज्य सरकारने १ एप्रिल २०१६ पासून राज्यात मद्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्याचे मुख्य सचिव अंजनीकुमार सिंह आणि अबकारी विभागाचे प्रधान सचिव के. के. पाठक यांना बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी अबकारी पोलीस दल स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यास सांगण्यात आले आहे.
राज्यात मद्यविक्रीमुळे आपले कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याने मद्यावर बंदी घालण्यात यावी, अशी आग्रही मागणी राज्यातील महिलांनी निवडणुकीपूर्वी केली होती. तेव्हा सत्तेवर आल्यास बंदी घालण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते.