बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या एका जाहीर कार्यक्रमातील पोलीस अधिकाऱ्यांचा किस्सा सध्या अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. पाटणा येथे सोमवारी एका कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राज्याचे पोलीस महासंचालक उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांनी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांना संबोधित केले. मात्र, यावेळी काही पोलीस कर्मचारी मोबाईलवर कँडी क्रश खेळण्यात व्यग्र असल्याचे दिसून आले. या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे समजते. पोलीस कर्मचारी मोबाईलवर गेम खेळत असतानाची ही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. या छायाचित्रांमध्ये अनेक कर्मचारी इंटरनेट सर्फिंग आणि कँडी क्रश खेळत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. काहीजण मोबाईलमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांची छायाचित्रेही पाहताना दिसत आहेत. या प्रकारामुळे बिहार पोलीस दलाची चांगलीच नाचक्की झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रात्री व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान मोदींच्या स्वागतासाठी खुद्द मेलानिया ट्रम्प देखील उपस्थित होत्या. या भेटीदरम्यान मेलानिया यांनी घातलेल्या पिवळ्या रंगाच्या गाऊनची खूपच चर्चा पाहायला मिळाली. या भेटीसाठी मेलानिया यांनी पूर्ण बाह्याचा फ्लोरल प्रिंट असलेला पिवळ्या रंगाचा गाऊन घातला होता. हा जगप्रसिद्ध ब्रँड Emilio Pucci चा गाऊन होता, ज्याची किंमत जवळपास दीड लाख रूपये असल्याचं समजत आहे. काही महिन्यांपूर्वी मेलानियाच्या टर्टलनेक ड्रेसचीही खूप चर्चा झाली होती. राष्ट्राध्यक्षांच्या शपथ विधी सोहळ्यात मेलानियाने Ralph Lauren ब्रँडचा ड्रेस परिधान केला होता. ट्रम्प यांच्या अनेक भूमिकांमुळे किंवा वक्तव्यांमुळे काही दिवसांपूर्वी मेलानियासाठी कपडे डिझाइन करण्यासाठी अनेक ब्रँडने नकारही दिला होता.