बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु असून भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्तेच्या दिशेने घोडदौड सुरु आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हं आहेत. मात्र बिहारमधील निवडणुकीचा अंतिम निकाल हाती येण्यासाठी रात्र उजाडणार आहे. निवडणूक आयोगाने रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरु असेल अशी माहिती दिली आहे. निवडणूक आयोगाकडून बिहारमधील मतमोजणीसंबंधी प्रसारमाध्यमांना माहिती देण्यात आली.

“बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागणार आहे. ईव्हीएमच्या संख्येत ६३ टक्के वाढ झाली असल्या कारणाने रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरु असेल,” अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. बिहारमध्ये तीन टप्प्यात चार कोटी १६ लाख लोकांनी मतदान केलं असून दुपारी तीन वाजेपर्यंत एक कोटी मतमोजणी झाली असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. मतमोजणीदरम्यान अद्याप कोणतीही अडचण आली नसल्याचंही यावेळी सांगण्यात आलं आहे.

आणखी वाचा- “पृथ्वीवरुन चांद्रयान नियंत्रित होतं, मग ईव्हीएम हॅक होणं शक्य नाही का?”

करोनामुळे निवडणूक आयोगाने मतदानादरम्यान प्रत्येक मतमोजणी केंद्रावर जास्तीत जास्त एक हजार ते दीड हजार मतदार जातील असं नियोजन केलं होतं. यामुळे मतदान केंद्रांची संख्या मात्र वाढवावी लागली होती. याचा परिणाम मतमोजणीवर झाला असून दुपारपर्यंत फक्त २० टक्के मतमोजणी पार पडली.

आणखी वाचा- NDA जिंकली तर नितीश कुमार मुख्यमंत्री होणार? भाजपा म्हणते…

बिहारमध्ये तीन टप्प्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाली असून दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल. बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात सत्ताधारी संयुक्त जनता दल आणि भाजप यांच्या ‘एनडीए’विरोधात राजदप्रणीत काँग्रेस, डाव्या पक्षांच्या महाआघाडीने दमदार आव्हान उभं केलं आहे. मतमोजणीनुसार, बिहारमध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्तेच्या दिशेने घोडदौड सुरु आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरेल अशी चिन्हे आहेत.