News Flash

‘दुसऱ्या देशात दहशतवादी हल्ले करणारे पाकिस्तानात मोकाट कसे?’, बिलावल भुट्टोंचा घरचा आहेर

इम्रान खान यांच्या सरकारवर बिलावल भुट्टोंचे टिकास्त्र

‘दुसऱ्या देशात दहशतवादी हल्ले करणारे पाकिस्तानात मोकाट कसे?’, बिलावल भुट्टोंचा घरचा आहेर
बिलावल भुट्टो आणि इम्रान खान

पाकिस्तानमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये पुन्हा एकदा चीनने खोडा घातला आहे. मसूदच्या विरोधात मत न देऊन चीनने पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला असतानाच तिकडे पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांना पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी)चे अध्यक्ष आणि पाकिस्तानी संसदेचे सदस्य बिलावल भुट्टो जरदारी यांनी दहशतवादाच्या मुद्यावरुन घरचा आहेर दिला आहे. पीपीपीचे अध्यक्ष असणाऱ्या बिलावल यांनी पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटनांवर सरकारचा वचक नसून ते मुक्तपणे काम करत असल्यचा आरोप केला आहे. दुसऱ्या देशांमध्ये दहशतवादी कारवाया करणारे दहशतवादी पाकिस्तानमध्ये मोकाट कसे फिरत आहेत असा सवाल बिलावल यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे.

इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असणाऱ्या तेहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या सरकारला बिलावल यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरुन चांगलेच धारेवर धरले. पाकिस्तानमधील सक्रिय दहशतवादी संघटनांवर कठोर कारवाई केली जात नाही. माझ्या आईचीही हत्या याच कारणामुळे झाली. हे दहशतवादी गट पाकिस्तानमध्ये लहान मुलांचे प्राण घेत आहेत. परदेशांमध्ये दहशतवादी कारवाया करत आहेत. आज संपूर्ण पाकिस्तानला दहशतवादाची किंमत मोजावी लागत असल्याचे बिलावल म्हणाले आहेत. तसेच इम्रान खान यांच्या सरकारमध्ये नेतेपदावर असणाऱ्या तीन जणांचे बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनांशी चांगले संबंध असल्याचा गौप्यस्फोटही बिलावल यांनी केला आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा हात असल्याचे म्हटले होते. त्यानंतर बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शेजारच्या देशांमध्ये दहशतवादी हल्ले करणाऱ्या संघटनांना पाकिस्तानमध्ये कोणतही स्थान नसल्याचे म्हटले होते. सर्व दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन इम्रान यांनी दिले होते. यानंतर काही दिवस ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेच्या कार्यालयावर बंदीची कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतर पुन्हा सर्व स्थिती जैसे थे झाली आहे. पाकिस्तानमधील दहशतवादाला चीनही खतपाणी घालत असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाच्या बैठकीमध्ये मसूदविरोधातील प्रस्ताव फेटाळून दाखवून दिले आहे.

१४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यामध्ये ४० हून अधिक सीआरपीएफचे जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले गेले होते. या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथील ‘जैश-ए-मोहम्मद’च्या दहशतवादी तळांवर २६ फेब्रुवारीच्या पहाटे हवाई हल्ला केला होता.

बिलावल सतत इम्रान सरकारवर दहशतवादाच्या मुद्द्यावर करत आहेत टिका

१७ फेबुवारी: म्युनिक येथील सुरक्षा परिषदेमध्ये पाकिस्तान हा दहशतवाद्यांसाठी स्वर्ग नसल्याचे बिलावल यांनी परिषदेला उपस्थित असलेल्या नेत्यांना सांगितले होते. मात्र पाकिस्तानला आपली अंतर्गत सुरक्षा टिकवण्यासाठी दहशतवाद्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. दहशतवादावर कारवाई झाली तरच पाकिस्तानचे भविष्य सुरक्षित होईल असं मत बिलावल यांनी व्यक्त केले होते.

२० फेबुवारी: इम्रान खान राजकीय स्टंटबाजी करत आहेत. याची त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल. पुलवामा हल्ल्यानंतर भारताच्या भूमिकेमुळे देशातील लोकांमध्ये सरकारविरोधात राग असल्याचे बिलावल म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2019 2:19 pm

Web Title: bilawal bhutto blasts pakistan government why are terrorists who attack other nations free
Next Stories
1 सुजय विखेंविरोधात नगरमध्ये प्रचार करणार नाही : राधाकृष्ण विखे-पाटील
2 काँग्रेसच्या काळात १५ वेळा सर्जिकल स्ट्राइक, अशोक गेहलोत यांचा दावा
3 तुम्ही चीनला मसूद अझहरविरोधात भूमिका घेण्यास का सांगितलं नाही ? भाजपाचा राहुल गांधींना सवाल
Just Now!
X