गुजरातचे कसाई असलेले नरेंद्र मोदी आता काश्मीरचे कसाई बनलेत अशी वादग्रस्त टीका पाकिस्तानमधील पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुट्टो झरदारी यांनी केली आहे. ज्यांनी काश्मीरमध्ये निष्पापांचे बळी घेतले ते आता दहशतवादाविरोधात बोलत आहेत असे झरदारी यांनी म्हटले आहे.
उरी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर टीका केली होती. पाकिस्तान दहशतवाद निर्यात करतो अशी टीका नरेंद्र मोदींनी केली होती. मोदींची ही टीका पाकिस्तानच्या जिव्हारी लागल्याचे दिसते. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुट्टो यांनी ट्विटरच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मात्र टीका करताना भुट्टो यांची जीभ घसरली. गुजरातमधील कसाई आता जम्मू काश्मीरचे कसाई झालेत असे सांगत या हुकूमशाही वृत्तीविरोधात जगभरातील देशांनी एकत्र येण्याची गरज आहे असेही बिलावल भुट्टो यांनी सांगितले. मोदी यांनी काश्मीरमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली केली असा आरोप भुट्टोंनी केला आहे. नेत्यांना आणि प्रसारमाध्यमांना काय हवे यापेक्षा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील लोकांना शांतता हवी आहे असेही बिलावल भुट्टोंनी म्हटले आहे.
बिलावल भुट्टो हे पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टो आणि माजी राष्ट्रपाती आसिफ अली झरदारी यांचे चिरंजीव आहेत. यापूर्वी भुट्टो यांनी भारताने बलुचिस्तानमधील पाकिस्तानी सैन्याने केलेल्या अत्याचारांचा मुद्दा उपस्थित केल्यावर नरेंद्र मोदींवर टीका केली होती. मोदींचे विधान प्रक्षोभक असून त्यांना पाकिस्तानच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये ढवळाढवळ करायची गरज नाही असे भुट्टो यांनी म्हटले होते. मोदींनी आधी काश्मीर अत्याचाराविषयी उत्तर द्यावे असे भुट्टोंनी म्हटले होते.