News Flash

सामूहिक प्रयत्नांद्वारे ‘साथ’मुक्तीकडे…

करोना महामारीसारख्या जागतिक संकटात कंपन्यांनी नफा कमावण्याच्या प्रेरणेने निर्णय घेऊन चालणार नाही किंवा राष्ट्रांच्या सरकारांनीही केवळ आपल्या नागरिकांचे रक्षण करण्याचे संकुचित उद्दिष्ट ठेवणे योग्य नाही...

बिल गेट्स/मेलिंडा गेट्स

दोन दशकांपूर्वी आम्ही जागतिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणारे एक प्रतिष्ठान (बिल अ‍ॅण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन) स्थापन केले. कारण ‘मायक्रोसॉफ्ट’च्या माध्यमातून मिळणारी संसाधने आम्हाला अनेकांच्या आयुष्यांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी उपयोगात आणायची होती. जोमाने वाढणाऱ्या कोणत्याही समुदायाचा पाया आरोग्य हाच असतो. गेल्या वर्षभरात या सत्याची सर्वांनाच स्पष्टपणे जाणीव झाली. कोविड साथीमुळे भारतात आणि एकूण जगभरात लोकांच्या जीवनाच्या दिशाच बदलल्या गेल्या. आमचे फाऊंडेशन दीर्घकाळापासून साथीच्या परिस्थितीचा विचार करत आहे, विशेषत: पश्चिम आफ्रिकेतील ईबोलाच्या साथीनंतर. तरीही कोविड-१९ साथीने अर्थव्यवस्था, रोजगार, शिक्षण आणि स्वास्थ्य सगळे काही ज्या प्रमाणात विस्कळीत केले, ते बघून आम्हालाही धक्का बसला. भारतात कोविड-१९ मुळे दीड लाखांहून अधिक जण दगावले आहेत, दीड कोटी लोक बाधित झाले आहेत आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम तर झालाच आहे.

पृथ्वीवरील जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याला स्पर्श करणाºया जागतिक धोक्यासाठी २०२० हे वर्ष लक्षात ठेवले जाईल. २०२१ मात्र कोविड-१९ साथीला दिलेल्या न्याय्य व प्रभावी प्रतिसादाचा लाभ संपूर्ण जगाला करून देणारे वर्ष म्हणून स्मरणात राहावे अशी आशा आम्हाला वाटते. या आशावादालाही आधार आहे. गेल्या वर्षभरात जगामध्ये सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने इतिहासातील सर्वात मोठे काम झाले; यामध्ये धोरणकर्ते, संशोधक, आरोग्यसेवा कर्मचारी, उद्योजक, तळागाळात काम करणारे, धार्मिक समुदाय आणि जगभरातील अन्य किती तरी जणांनी एकत्र येऊन नवीन मार्गांनी प्रयत्न केले.

अशा प्रकारचा सर्वांनी मिळून केलेला प्रयत्न महत्त्वाचा आहे. कारण अशा प्रकारच्या जागतिक संकटात कंपन्यांनी नफा कमावण्याच्या प्रेरणेने निर्णय घेऊन चालणार नाही किंवा राष्ट्रांच्या सरकारांनीही केवळ आपल्या नागरिकांचे रक्षण करण्याचे संकुचित उद्दिष्ट ठेवणे योग्य नाही. यासाठी खूप वेगवेगळे लोक आणि अनेकांच्या हिताची धोरणे एकत्र आणून अखिल मानवजातीच्या कल्याणाचा विचार करणे आवश्यक आहे.
हा सहकार सुलभ करण्यासाठी सेवाभावी वृत्ती उपयोगी पडते. आमचे फाऊंडेशन गेल्या अनेक दशकांपासून संसर्गजन्य आजारांवर काम करत असल्याने आमचे जागतिक आरोग्य संघटना, तज्ज्ञ, सरकारे आणि खासगी क्षेत्राशी दीर्घकाळापासून संबंध आहेत. आमच्या फाऊंडेशनचा विशेष भर जगातील सर्वात गरीब असलेल्यांच्या आयुष्यातील आव्हानांवर असल्याने साथीच्या काळातील प्रतिसादामध्ये सर्वांना सहभागी करून घेण्याचे महत्त्व आम्हाला पटलेले आहे. यामध्ये अगदी अल्प उत्पन्न गटांतील देशांचाही विचार झाला पाहिजे असे आम्हाला वाटते.

आजच्या तारखेपर्यंत आमच्या फाऊंडेशनने कोविड-१९ साथीविरोधातील लढ्यासाठी १.७५ अब्ज डॉलर्सचा मदतनिधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीपैकी बहुतांश महत्त्वाच्या वैद्यकीय उत्पादनांच्या निर्मितीसाठी आणि खरेदीसाठी वापरला गेला आहे. उदाहरणार्थ, कोविड-१९ आजारासाठी नवीन उपचारपद्धती विकसित करणाºया संशोधकांना आम्ही पाठिंबा दिला आणि ही औषधे वाहतुकीसाठी सुलभ असतील व जगातील सर्वात गरीब देशांमध्ये वापरली जाऊ शकतील अशा पद्धतीने तयार करण्यासाठी आम्ही काम केले; जेणेकरून त्यांचा लाभ जगभरातील रुग्णांना होऊ शकेल. या विषाणूविरोधात सुरक्षित व प्रभावी लस शोधून काढण्यासाठी आणि तिच्या वितरणासाठीही आम्ही साहाय्य केले आहे.

कोविड-१९ वरील प्रतिबंधक लशी उपलब्ध होऊ लागल्या आहेत, हे जागतिक संघटनांतील शक्तीचे प्रतीक आहे. कोणताही देश किंवा कंपनी एकट्याने हे यश साध्य करू शकली नसती. जगभरातील निधीपुरवठा करणाºयांनी संसाधने एकत्र केली, प्रतिस्पर्धी राष्ट्रांनीही संशोधनातील निष्कर्षांचे आदानप्रदान केले आणि जागतिक तंत्रज्ञानात गेल्या अनेक वर्षांपासून केल्या गेलेल्या गुंतवणुकीचा परिणाम म्हणून सर्वांना बºयाच लवकर यश प्राप्त झाले. या साºयाची परिणती म्हणून लसविकासाचे एक नवीन विश्व सर्वांसाठी खुले झाले.

लशीचा जगातील सर्वात मोठा उत्पादक म्हणून भारत या प्रयत्नांमध्ये निर्णायक भूमिका पार पाडत आहे. आमचे फाऊंडेशन आणि ‘गावि’ या संस्थेने भारताच्या सीरम इन्स्टिट्यूटबरोबर त्यांच्या कोविड-१९ वरील लशीच्या उत्पादनाच्या क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने भागीदारी केली आहे. यामुळे लशीचे उत्पादन प्रचंड मोठ्या संख्येने करणे शक्य होईल आणि अल्प तसेच मध्यम उत्पन्न गटातील राष्ट्रांना दर्जेदार लस परवडण्याजोग्या किमतीला मिळू शकेल. आणखी काही नवीन लशी तयार झाल्यानंतर आणखी भारतीय उत्पादकांशी भागीदारी करण्यासाठीही आम्ही उत्सुक आहोत.

अर्थात, सुरक्षित व प्रभावी लस विकसित करणे ही केवळ सुरुवात आहे. लशींचे वितरणही खूप महत्त्वाचे आहे. आता ज्यांना लशीची गरज आहे, त्यांच्यापर्यंत ती पोहोचवण्यासाठी जगाने प्रयत्न केले पाहिजेत, मग ते कुठेही राहणारे असोत. किती जण कोविड-१९ आजाराने ग्रस्त आहेत याचा अंदाज लावणे आज कठीण वाटत असले, तरी एक दिवस ही साथ संपुष्टात येणार हे नक्की आहे. जेव्हा हा क्षण येईल, तेव्हा त्याचे श्रेय या संकटातून मार्ग काढण्यासाठी एकत्र आलेल्या जगभरातील लोकांना द्यावे लागेल. त्यांच्या धैर्य व वचनबद्धतेच्या जोरावर आपण साथीतून बाहेर येऊ.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2021 9:23 am

Web Title: bill gates and melinda gates special article on coronavirus epidemic diseases nck 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 संपूर्ण कृषी उद्योग ‘दोन मित्रां’च्या सुपूर्द करण्याची मोदी यांची इच्छा- राहुल
2 करोना रुग्णांची प्रारंभिक माहिती देण्यास चीनचा नकार
3 ‘ट्रम्प यांच्यावरील आरोप राजकीय सूडबुद्धीने’
Just Now!
X