भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संपूर्ण जगभर प्रसिध्द आहेत. त्यातच भारताचे लसीकरणाचे धोरण आणि लस मैत्री यासारख्या योजनांमुळे तर भारताचे आणि प्रसंगी पंतप्रधान मोदींचे नाव खूप आदराने घेतले जाते. बऱ्याचवेळा आपल्याला याचा प्रत्यय आला आहे. आज पुन्हा एकदा याची प्रचिती आली कारण ग्रेटर टोरोंटो क्षेत्रात होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. त्यावर कॅनडाला कोविड-१९ लसीचा पुरवठा केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे आभार मानले आहेत.

जगातील विविध देशांना लसींचा पुरवठा करण्यात भारत आघाडीवर आहे आणि केवळ जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) यांनीच नव्हे तर मानवी समाजाच्या उन्नतीसाठी वचनबद्ध असलेल्या व्यक्तींनीसुध्दा कौतुक केले आहे.
गेल्या आठवड्यात भारताने कॅनडाला कोविशिल्ड लसींचे ५ लाख डोस पाठवले, कॅनेडियन भागीदार व्हॅरिटी फार्मास्युटिकल्सकडे हा माल पाठवण्यात आला.

काही दिवसांपूर्वी व्हर्च्युअल इंडिया-स्वीडन शिखर परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की आतापर्यंत ५० हून अधिक देशांना ‘मेड-इन-इंडिया’ लस पुरविल्या गेल्या आहेत. ते म्हणाले होते की, येत्या काही महिन्यांत अधिक देशांना लसी पुरवण्याची नवी दिल्लीची योजना आहे.

गेल्या महिन्यात डब्ल्यूएचओने भारताच्या लसीकरणाच्या योजनेचे कौतुक केले होते. “भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण समानतेला पाठिंबा दर्शविल्याबद्दल धन्यवाद. कोवॅक्स बद्दलची आपली वचनबद्धता आणि कोविड -१९ लसींचे डोस इतर देशांना वितरीत केल्यामुळे ६० पेक्षा जास्त देशांना त्यांचे आरोग्य कर्मचारी आणि इतर प्राधान्य गटांना लसी देण्यास मदत होत आहे. मला आशा आहे की इतर देश आपल्या उदाहरणाचे अनुकरण करतील,” डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अॅडॅनॉम घेबेरियसस यांनी फेब्रुवारीमध्ये सांगितले होते.

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनीही भारतीय प्रयत्नांचे कौतुक केले होते आणि म्हटले आहे की कोविड -१९ विरुद्ध जागतिक लढाईत वैज्ञानिक नवकल्पना आणि लस उत्पादक क्षमता मध्ये भारताने फार चांगले नेतृत्व केले आहे.
जानेवारीत भारताने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ट आणि भारत सरकारच्या मालकीच्या भारत बायोटेक या दोन लसींच्या निर्मितीस मान्यता दिली होती.